Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रमहाबळेश्वर तालुक्यातील मोरणी ते शिंदी रस्ता रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम...

महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी ते शिंदी रस्ता रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम केव्हा सुरू होणार ? स्थानिकांचा सवाल

हाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागातील मोरणी ते शिंदी रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे तसेच स्थानिक तरुणांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी मिळाली आहे. या अगोदर अनेक पिढ्या गेल्या परंतु रस्त्याला मंजुरी मिळाली नव्हती. वन विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या काही अटी शर्ती पूर्ण करण्यासाठी ८ महिन्याचा कालावधी गेला तो अडथळा देखील दूर झाला असला तरी या रस्त्याचे रस्ता रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू झाले नसल्यामुळे या भागातील रहिवाशांना दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचंड अशी गैरसोय होऊन रुग्ण कधी कधी दगावला जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी सार्वजनिक बांधकाम नक्की काम कधी सुरू करणार की अजून काही रुग्ण दगावले जावेत याची वाट बघत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या बाजूलाच मोरणी शिंदी हे गाव असून सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. ते तातडीने होणे गरजेचे आहे. वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत आम्ही परवानगी दिली असली तरी आता फक्त सार्वजनिक बांधकामाचे हे काम आहे. नाहीतर पुन्हा नव्याने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब होऊ शकतो. या भागातील रस्ता अनेक वर्ष कच्चा असल्याने पावसाळ्यामध्ये जून ते नोव्हेंबर दरम्यान खेड ते अकल्पे एस टी आराव येथे थांबून परत फिरते तर महाबळेश्वर ते शिंदी राज्य परिवहन सेवेची एसटी बस ही उचाट येथे मुक्काम करून परत फिरते. त्यामुळे या भागातील शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया यांना रुग्णालयात नेताना स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मोरणी ते शिंदी १४ कि.मी. चा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याने राज्य परिवहन सेवेचा लाभ शेवटच्या गावापर्यंत नागरिकांना मिळत नाही. असा रस्ता असल्यामुळे परिवहन मंडळाच्या एसटीचा टायर फुटणे , पंक्चर होणे व इतर काही कारणामुळे एस टी बंद पडत असल्याने नुकसान होत असते. संबंधित विभागातील काही व्यापाऱ्यांची छोटी-मोठी वाहने आहेत. ते सुद्धा या कच्च्या रस्त्यामुळे बंद पडत असतात. कधी बारामाही दळणवळणासाठी संबंधित रस्ता तातडीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर यांनी लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण काम सुरू करणे गरजेचे आहे. अशी स्थानिकाची मागणी आहे. या बाबीकडे प्रशासन दखल देणार का ,? त्याची उत्सुकता स्थानिकांना लागली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments