अंबरनाथ : आपल्या आयुष्यात कोणताही ‘सुयोग’ येण्यासाठी पण एक चांगला योग जुळून यावा लागतो. तसा तो सुयोग माझ्या आयुष्यात २०१२ ला आला… आणि मी ही मंडळाच्या प्रथेप्रमाणे माननीय जोगळेकर ताईंच्या स्मृतीस वंदन करून सुयोग मंडळात पदार्पण केले आणि सुयोग शी माझ्या रेशीम गाठी जुळून आल्या…. त्या वेळी मी नुकतीच रिटायर्ड झाले होते. ३५ वर्षे नोकरी करून खूप कंटाळा आला होता. आयुष्यात काहीतरी वेगळं करावं..हसावे, गावे, नाचावे असे खूप मनांत येत होते आणि त्याच वेळेस मला सुयोग मंडळांत सामील होण्याची सुवर्णसंधी मिळाली.. सर्व प्रथम मला बागेश्री गृप मिळाला. नविन नविन थोडे बावरल्यासारखे व्हायचे पण सर्व मैत्रिणींनी सांभाळून घेतले. बागेश्री गृप मधे असताना मला गृप लिडरचे पद मिळाले. स्टेजवर वावरणे, माईकवर निवेदन करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे अशा अनेक गोष्टी मी सुयोग मध्ये शिकत गेले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आमच्या मंडळाच्या नियमानुसार पांच वर्षांनंतर सर्वांचे गृप बदलतात. तसा माझा पण गृप बदलला व मी बिंदी गृप मधे दाखल झाले. सुयोग मंडळाचा हाच हेतू असतो की महिलांनी सतत काहीतरी नवीन करावं, कार्यरत रहावं. नवीन गृप, नवीन मैत्रिणी, नवे विचार, नव्या कल्पना, एकत्र येऊन नवीन कार्यक्रम करणे यामुळे मन व शरीर सतत आनंदी व उत्साही राहू लागले… सुयोग मंडळामुळे कोविडच्या काळातही आम्ही सर्व मैत्रिणी आनंदी रहात होतो. घरी बसून कार्यक्रम करीत होतो. कारण मंडळातील ज्येष्ठ महिलांनी ऑनलाईन मंडळ चालू ठेवले होते. त्या कधी लिखाणाचे, तर कधी कवितांचे..तर कधी सोलो डान्स चे टास्क द्यायच्या… आणि आम्ही कोरोनाची भीती विसरून आनंदाने भाग घेत होतो… याबद्दल सुयोग चे आभार मानावे तेवढे कमीच…. सुयोग मंडळामुळे मला खूप मैत्रिणी मिळाल्या. आम्ही खूप मज्जा करतो. गृपचे कार्यक्रम काय, सणवार काय, सहली, भिशी पार्ट्या…फुल्ल टू धम्माल ! एकत्रित होऊन कोणतेही कार्य कसे पार पाडावे हे सुयोग मध्ये मला समजले. एकमेकींचा मान राखला व स्वाभिमान जपला तर कोणाशीही केलेली मैत्री टिकते हे मला सुयोग मंडळाने शिकविले… अर्थातच अशा आपुलकीच्या वातावरणात माझ्या ही मनाची कळी खुलली आणि मी सुयोग मध्ये रूळली. सुयोग मध्ये मला माझ्यातील ‘हरवलेली मी मला गवसली’ .. माझ्या तील ‘ प्रतिभा’ जागृत झाली.. मी लिहू लागले, कविता करू लागले. माझ्यातील गाण्याच्या, नृत्यकलेच्या आवडीला एक चांगले व्यासपीठ मिळाले. सुयोग मुळे मला आकाशवाणी वर गाणे गाण्याची संधी मिळाली, प्रारंभ एकॅडमी, श्रावण महोत्सव अशा कार्यक्रमातून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविता आली..हे तर माझे मोठे भाग्यच… आमच्या सुयोग मंडळाला अंबरनाथमध्ये खूप मानाचे स्थान आहे. त्यामुळेच अंबरनाथच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत आम्ही अग्रस्थानी असतो.. याचा आम्हा सर्व सभासदांना अभिमान वाटतो… गेली ५० वर्षे चालणारे हे मंडळ, येथील ज्येष्ठ व श्रेष्ठ महिलांनी बसविलेली मंडळाची घडी, शिकवण, शिस्त व बांधिलकी या सर्व गोष्टी माझ्या मनाला खूप भावल्या. अनेक विचारांच्या व स्वभावाच्या महिलांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याची किमया सुयोग मंडळांत अनुभवास मिळते. सुयोग मुळे मला जगण्याचा आनंद मिळाला. आता तर सुयोग मंडळ मला माझे घरटेच वाटते.. इथे मी एखाद्या मैने सारखी मुक्त संचार करते, तर कधी पोपटासारखी मनसोक्त गप्पा गोष्टी करते.. कधी कोकिळेसारखी गाणी म्हणते तर कधी मोरा सारखी नृत्य करते… अशा आमच्या सुयोग मंडळाची मी कायम ऋणी राहीन… मला तर वाटते, आयुष्याच्या रोजच्या कंटाळवाण्या पायवाटेवर ‘सुयोग मंडळांसारखी’ मंडळे आहेत म्हणून अनेक महिला आनंदाच्या हिरवळीवर दोन घटका विसावत आहेत..हे आमचे भाग्यच नाही कां?…
– सौ. प्रतिभा मोरे, अंबरनाथ.