मुंबई
: मुंबईतील एनटीसीच्या चार बंद गिरण्यातील कामगा रांच्या थकीत पगारावर राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी आज हंगामा केला.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार आज हे निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले होते.बंद मिलच्या कामगारांनी आज एनटीसी हाऊस मध्ये घोषणा देत अधिक-यांना घेराव घातला.
एनटीसीचे कार्यकारी अधिकारी पी.कुंगुमाराजू यांनी संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले की, कामगारांचा येत्या दोन महिन्यांत थकीत पगार मिळेल आणि तो पुढे सातत्याने मिळत राहील.गिरण्या बंदच्या काळात निवृत्त होणा-या कामगारांना त्यांची देणी देण्या बाबत,तसेच खाते निहाय सेवा बढतीचाही प्राधान्याने विचार केला जाईल,असेही एनटीसी अधिका-यांनी शिष्टमंडळाला आश्वासन देताना सांगितले.
गेल्याच महिन्यात २४ डिसेंबर रोजी गिरणी कामगारांनी तीन महिन्याच्या थकीत पगारासाठी एनटीसी व्यवस्थापनाला घेराव घातला होता.त्यावेळी एनटिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंगुमाराजू यांनी दिल्ली होर्डींग्ज कंपनीशी बोलणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते.पण या प्रश्नावर संघटनेने सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाने अकारण कालापव्यय लावला. त्यामुळे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आज निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले.
खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रधान कार्यालयावर तिव्र निदर्शने केली.संघटनेचे उपाध्यक्ष सूनिल बोरकर हे न्यायालयातील तांतडीच्या कामामुळे आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत तरी त्यांचे याकामी महत्त्वपूर्ण सहकार्य राहीले आहे.
संघटन सेक्रेटरी दीपक राणे,बबन आसवले, प्रकाश भोसले,सखाराम भणगे,गजानन कदम यांचा आंदोलन यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. सुनिता खराडे,पूजा माळकर,छाया पाटील,सुभाष नारकर, राजेंद्र नारकर,आरती आणसूळकर आदी
कार्यकर्ते, प्रतिनिधीनी आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील देशभरातील चालू असलेल्या २३ गिरण्या सन २०२० मध्ये कोविडचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या,त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत.रामिम संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समन्वयक कृती समिती स्थापन करुन दिल्ली संसदेवर आंदोलन छेडण्यात आले होते.या प्रश्नावर खासदारांच्या शिष्टमंडळाकडून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेटही घेण्यात आली होती.परंतु या प्रश्नावर केंद्र सरकारने पहिल्या पासूनच नरो वा कुंजोरोची भूमिका घेतली.या गिरण्यात
मुंबईतील टाटा,इंदू मिल क्र.५,पोद्दार, दिग्विजय तसेच बार्शी,अचलपूर या महाराष्ट्राच्या सहा एनटीसी गिरण्यांचा समावेश आहे.मुंबईतील गिरण्या म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे,या द्रुष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहिले गेले आहे.
मुंबईसह राज्यातील सहा एनटीसी गिरण्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत किमान तीन वेळा गिरणगावात अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने छेडण्यात आली.एनटीसी गिरण्यांची स्थावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची आहे.देशातील इस्पितले,सरकारी कार्यालये आदींसाठी लागणारे कापड, एनटीसी गिरण्यां मधून सक्तीने खरेदी करण्याची अट घालण्यात आली असती तर या गिरण्या सुस्थितीत चालू शकल्या असत्या,शिवाय या गिरण्यांचे आधुनिकीकरण झाले असते,तर या गिरण्यावर बंदची पाळी आली नसती, या गोष्टीकडे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
एनटीसी बंद गिरण्यांच्या प्रश्नावर संघटना नेतृत्वाने न्यायालयाचा मार्ग अनुसरतानाच,अनेक खासदारांना निवेदने देऊन हा प्रश्न केंद्रीय स्तरावरून सोडविण्याचा आग्रह केला आहे.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.या प्रश्नावर लवकरच वस्त्रोद्योगमंत्री यांचीही भेट घेण्यात येणार आहे.
या गिरण्या सरकारला चालवाव्याच लागतील अन्यथा कामगारांना पगार द्यावाच लागेल,असा आजच्या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा देण्यात आला आहे.