प्रतिनिधी – जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता अधिवेशन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व भारताचे केंद्रीय अवजड उद्योग व स्टील खात्याचे मंत्री श्री.एच.डी. कुमार स्वामी, कर्नाटकचे माजी कृषिमंत्री बंडप्पा काशेमपुर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनात नजीकच्या काळात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी, त्यासाठी घ्यावयाचे शेतकरी पेन्शन, वाढती महागाई, वीज दरवाढ, बेरोजगारी, वाढता कर्जबाजारीपणा आदी प्रश्नांबाबत चर्चा करून आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने विचार होणार आहे.
संघर्षाच्या मार्गातून सातत्याने जनतेच्या प्रश्नावर लढणारा पक्ष अशी जनता दलाची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलर प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले आहे.