प्रतिनिधी : भौतिक सुखाच्या पाठीमागे लागल्यामुळे मनुष्य दुःखी होत आहे. आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा विचार न करता तो दुरच्या गोष्टीच्या पाठीमागे लागला आहे. सर्व प्राण्यात मनुष्य प्राणी हुशार आहे त्याला विचार करण्यासाठी बुध्दी आहे. निष्काम भावनेने प्रामाणिक प्रयत्न केल्यास जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल असा मंत्र पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे 108 प.पूज्य श्रीमहंत मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज यांनी दिला ते पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील श्री दत्त मंदिराच्या मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळयाप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगली येथील श्री क्षेत्र औदुंबर चे केदार प्रमोद जोशी, डाकेवाडी येथील त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ, श्री दत्त मंदीर जीर्णोध्दार समिती आणि समस्त ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
श्रीमहंत मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाले की, निष्काम कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग यापैकी एक मार्ग स्वीकारल्यास आपण जीवनात यशस्वी व्हाल. सद्गुरुंच्या संगतीने आपण आयुष्याचे परिवर्तन करायला पाहिजे. आपल्या जन्मापासूनच भव दुःखे आपल्या सोबती आहेत यातून मुक्त होण्यासाठी, सुंदर जीवन जगण्यासाठी, ज्ञानाची, कृपेची आणि धनाचीही आवश्यकता असते. परंतू हे धन योग्य मार्गाने मिळवायला हवे. संत ज्ञानेश्वरांसाठी संबोधलेला ‘माऊली’ हा शब्द खूप व्यापक आहे. यातील ‘मा’ म्हणजे माय, ‘ऊ’ म्हणजे उदारता आणि ‘ली’ म्हणजे लीनता. या संकल्पनेने आपण जीवन व्यतीत केल्यास जीवन सुंदर होईल.
प्रारंभी श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहन समारंभ पार पाडला. यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण मंदिराचे पायाभरणीपासून कळसापर्यंत विनामूल्य काम करणारे गावातीलच तुकाराम डाकवे, अवधूत डाकवे, लक्ष्मण घाडगे तसेच मंदिर कामाला वेळोवेळी सहकार्य करणारे ग्रामस्थ यांचा सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंदीराचा मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन सोहळयानिमित्त श्री गणेश पुजन, होमहवन, वास्तुशुध्दी, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर, ह.भ.प.अनिल महाराज देवळेकर यांची कीर्तने, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रम राबवले गेले होते.
या उत्सव काळामध्ये गावामध्ये प्रत्येक घरावर तोरणे, गुढी लावली होती तर दारात सडा-रांगोळया काढली होती. पहिल्या दिवषी टाळ, मृदूंग, ताशा, हलगी, तुतारी फटाक्यांच्या आताषबाजीत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘दत्त माझा’ च्या जयघोषात रथातून श्री दत्त, श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम यांच्या मुर्तीची आणि मंदिरावर बसवण्यात आलेल्या कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत डाकेवाडीतील सर्व अबालवृध्द, माहेरवाशीनी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. मिरवणूकीत पारंपारीक पोषाखातील ग्रामस्थ, भगव्या पताका घेतलेले बाल वारकरी यांच्यासह सजवलेली बैलगाडी, घोडे सहभागी झाले होते. भरेवाडी ते डाकेवाडी येथे काढलेल्या मिरवणूकीच्या पुढे हंबीरराव डाकवे यांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. शहाजी वास्के यांनी सर्वांना बांधलेले भगव्या रंगाचे फेटे मिरवणूकीची शोभा वाढवत होते.
कडाक्याच्या उन्हातदेखील मुंबई, पुणे आणि परगावी कामानिमित्त असलेले चाकरमानी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, संजय देसाई, पंजाब देसाई, सतीश तवटे, प्रवीण निवडूंगे, तानाजी चाळके, सदाशिव साबळे, भाऊ साबळे, दत्तात्रय चोरगे या मान्यवरांसह परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व अन्य पदाधिकारी यांनी श्री दत्त मंदिराला सदिच्छा भेट देवून लोकांच्या एकोप्याचे कौतुक केले.
लोकसहभागाचा उत्कृष्ट नमुना:
दोन वर्षापासून गावातील सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून डाकेवाडीतील हे भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहिले आहे. लोकांचा सहभाग असेल तर काय होवू शकते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डाकेवाडीत उभी राहिलेली श्री दत्त मंदिराची भव्य आणि दिव्य अशी वास्तू होय.