Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रभारताच्या नेतृत्वाकडे जगाची आशा - सरसंघचालक

भारताच्या नेतृत्वाकडे जगाची आशा – सरसंघचालक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “भारताने जगाचे नेतृत्व करावे यासाठी भारताची प्रतिक्षा सारे विश्व करतेय. भारताला इथवर नेण्यात अनेकांनी आपले समर्पण केले. समर्पण भावनेतूनच विश्वाला मार्ग दाखवायचा आहे. आज भारतीयांनी देशासाठी, समाजासाठी समर्पण भावनेतून कार्य केले पाहिजे, यातूनच भारताला आपण विश्वगुरू स्थानी नेऊ शकू. येणारी पिढी या मार्गाने चालेल आणि भारताला विश्वात गौरवशाली करेल हा विश्वास आहे.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भिवंडी शाळेच्या वतीने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ध्वजवंदन सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान सरसंघचालकांच्या शुभहस्ते शाळेच्या प्रांगणात सकाळी ८.१५ वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, “भारत देश पुढे जातोय, प्रगती करतोय, जगात अग्रेसर होत आहे याने सामरिक शक्तीतही वृद्धी होतेय. अण्णासाहेब जाधव यांच्यासारख्या पूर्वजांमुळे, त्यांनी जगलेल्या त्यागपूर्ण जीवनामुळेच या गोष्टी शक्य झाल्या.”

भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत बोलताना ते म्हणाले, “भारताचा राष्ट्रध्वज हा स्वतंत्रतेचे प्रतीक आहे. या तिरंग्यातील केशरी रंग हा त्यागाचा रंग आहे. त्याचप्रमाणे तो सर्वस्व समर्पणाची प्रेरणा देणाराही रंग आहे. पांढरा रंग सुचेता तर हिरवा रंग समृद्धी दर्शवतो. राष्ट्रध्वजातील ‘अशोक चक्र’ हे बंधुता, बंधुभाव व समरसतेचा संदेश देते.”

कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
====
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोतदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरे सादर केले तर शाळेच्याच काही मावळ्यांनी आपल्या नृत्यातून शौर्य प्रदर्शन सादर केले.
======
बंधूभाव हाच शाश्वत धर्म
धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म असून याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान मांडताना केला होता. याच बंधूतेच्या आधारे व्यक्ती मोठा झाला तर त्याचे कुटुंब मोठे होईल आणि पर्यायाने समाजही मोठा होईल. त्यामुळे समाजाला आपला देश बनवा आणि यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments