मुंबई : सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा मोठा फटका स्थानिक मुंबईकरांना बसत आहे. दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये-जा करावी लागत आहे. शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत असल्याने पालक सतत चिंतेत असतात. सायन पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.सायन पुल प्रश्नी मुंबई काँग्रेसने खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सायन रेल्वे स्थानकाबाहेर सरकारच्या उदासीनतेचा निषेध करत जोरदार आंदोलन केले व रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा युती सरकार आपल्या लाडक्या उद्योगपती मित्रांसाठी २४ तास कार्यरत असते पण प्रवाशांची सुरक्षा आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या भवितव्याची त्यांना पर्वा नाही. सायन पुलाचा मुद्दा हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. पुनर्बांधणीसाठी सायन पुलाला बंद करून पाच महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे परंतु पुनर्बांधणीच्या कामात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही. सरकारच्या हलगर्जीपणामुळे दररोज शेकडो लोकांना अरुंद व असुरक्षित पदपथावरून जाताना स्वतःची सुरक्षा धोक्यात घालावी लागते. सायन पूल बंद करण्यापूर्वी वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांच्या, विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी काँग्रेसने केली होती मात्र भाजपा युती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.सामान्य मुंबईकरांच्या समस्या सोडवणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण भाजपा सरकार निर्ढावलेले आहे ते फक्त मूठभर श्रीमंतांसाठीच काम करत आहे. काँग्रेस पक्ष मात्र मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहे. सायन पुलाच्या प्रश्नी सुद्धा सरकारने तातडीने काम पूर्ण करावे तोपर्यंत पर्यायी सोय करून स्थानिक मुंबईकरांची दररोजची तारेवरची कसरत दूर करावी, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
सायन पुलाच्या संथ गतीच्या बांधकामाचा स्थानिकांना प्रचंड त्रास, बांधकाम जलदगतीने पूर्ण करा – खा. वर्षा गायकवाड
RELATED ARTICLES