प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नवं गीत आज मुंबईत दादरमधील शिवसेना भवनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अरविंद सावंत यांच्यासह विनोद घोसाळकर उपस्थित होते.
‘शिवसेनेची मशाल… एकनिष्ठ सेनेची मशाल… हे नवं गीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आले. मशालीचं जे तेज आणि आग आहे, ही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचेल. चिन्ह नवीन आहे. पण ती मशाल आहे. या गीतातही शिवसेनाप्रमुखांच्या हातात मशाल दिसून येतेय. ही मशाल शिवसेनेला आणि महाराष्ट्राला नवीन नाही. म्हणून शिवसेना गीताच्या रुपानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही मशाल अधिक प्रकाशमान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
‘शिवसेनेचं नवीन गीत आम्ही महाराष्ट्रातील जनतेसमोर सादर केलं आहे. मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकीने झालेलीच आहे. आता मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल चिन्ह हे पोहोचलेलं आहे. ही मशाल एक चिन्ह म्हणून नाही तर सरकार विरोधात जो काही जनतेत असंतोष आहे, तो या मशालीच्या रुपाने भडकणार आहे. मशालीच्या आगीत ही जुमलेबाजी आणि हुकूमशाही राजवट जळून भस्म होईल. हा आम्हाल आत्मविश्वास आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेची ‘मशाल’ हुकूमशाही वृत्तीला जाळणार! आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत प्रदर्शित झाले. तसेच ‘मशाल’ ह्या निवडणूक चिन्हाचे देखील अनावरण करण्यात आले.
‘जसं गीत सादर केलं आहे. तसेच मशालीचं नेमकं चित्र बनवण्यात आलं आहे. ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवर हे चिन्ह असेल. हे चित्र सर्वसामान्य जनता आणि नागरिकांसमोर हे चित्र शिवसैनिकांनी न्यावं. मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हांत कुठलाही गैरसमज होता कामा नये, म्हणून हे चिन्ह प्रचार करताना शिवसैनिकांनी वापरावं. शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिथे-जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.