Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई शहर, पुणे ग्रामीण छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे मानकरी  

मुंबई शहर, पुणे ग्रामीण छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे मानकरी  

मुंबई ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघांनी विजेतेपद मिळविले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर पुर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर 35-31 असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने बाजी मारली. मुंबई शहर पश्चिम संघावर 37-28 असा विजय मिळवित स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथमच 44 लाख 60 हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली.
बारामतीमधील रेल्वे मैदानावर संपलेल्या दिमाखदार कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर व माया आक्रेउपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, एसजीए कंपनीचे गौतम छेड्डा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्यावतीने कबड्डी खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेस 95 लाख रुपयांचा धनादेश श्री. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय दर्जेला साजेसे असे 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खेळाडूंसह बारामतीमधील कबड्डीशौकिन आयोजकांचे कौतुक कौतुक होत आहे. सलग पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. मॅटवरील कबड्डीची 4 मैदाने, तीन व्यासपीठ, तीन दिशांना असलेली प्रेक्षक गॅलरीसह समारंभासाठी असलेले व्यासपीठ अशी भव्य रचना एसजीए कंपनीने निर्माण केली होती.
शिवकालीन तटबंदीचे व्यासपीठासह मुख्य प्रवेशव्दारावरील कबड्डीची चित्रे लक्ष वेधी ठरली. एसजीए कंपनीनी यापूर्वी नाशिकमील राष्ट्रीय युवा महोत्सव, उदगीरमधील खाशाबा जाधव स्पर्धा, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुण्यातील महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व हरियाणाव पुण्यातील तील झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या संयोजनात मोलाची भूमिका बजावली होती. आता बारामतीमधील स्पर्धा यशस्वी करून एसजीए कंपनीच्या क्रीडा शौकिनांची मने जिंकली आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments