Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रस्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज - डॉ....

स्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई(शांताराम गुडेकर ) : सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनने आज भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर एक व्यापक संशोधन अहवाल सादर केला. मासिक पाळी ते रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहून मासिक पाळीत दुर्गम भागाततील तसेच, ऊसतोड कामगार महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत वक्तव्य करून सर्वांचे लक्ष त्याकडे गांभीर्याने वेधले.
हा संशोधन अभ्यास भारतातील १४ जिल्ह्यांमधील २०-४९ वयोगटातील मासिक पाळी येत असलेल्या महिलांच्या वांशिक डेटावर आधारित आहे. या अहवालात कामासाठी स्थलांतरित जसे की, ऊस कारखाने वीटभट्ट्या आणि खाणींमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीत भेडसावणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बीड, धारावी आणि पालकर सारख्या भागातील महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर या कार्यक्रमात विशेष चर्चा करण्यात आली.
याविषयी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘मासिक पाळी येण्यापासून ते थांबण्यापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये अविस्मरणीय असतो. ही स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक अवस्था आहे. खेड्यापाड्यात मासिक पाळीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या या संदर्भातील समस्यांवर महाराष्ट्रात अनेक संस्था, राज्य शासनाबरोबर काम करीत आहेत. तसेच आपणही ऊसतोड कामगार विभाग, आरोग्य विभाग अशा चार ते पाच विभागांना अहवाल सादर करू’, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
तसेच, मासिक पाळीत वेगवेगळ्या प्रकारची साधने आणि त्यांचा वापर याविषयीचा अभ्यास करून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमात महिलावर्गाला माहिती दिली. त्याचबरोबर स्त्री केंद्रित दृष्टिकोनातून विचार करत पुरुष वर्गाने यावरील मौन सोडलं पाहिजे. स्त्रीला समजणं महत्त्वाचं आहे, पुरुषांना जर हे समजलं तर त्यांना पाळी ते रजोनिवृत्ती पर्यंत सर्व समजून जाते याचा त्यांनी भाषणात विशेष उल्लेख केला.
पुढे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ऊसतोड कामगार महिलांमधील गर्भाशय शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण दिसते. ऊसतोडीच्या ठिकाणी असणारे कामाचे ओझे, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळात काम करण्याची सक्ती यामुळे वारंवार उद्भवणारी गर्भाशयाशी संबंधित दुखणी त्यामुळे होणारे गर्भपात, खासगी दवाखान्यातील महागडे उपचार, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड या प्रश्नांकडे आपण प्रामुख्याने पाहणे आवश्यक आहे.”
यावेळी कार्यक्रमाला डॉ.विभूती पटेल, अर्थशास्त्रज्ञ आणि माजी प्राध्यापक, टीआयएसएस आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ, प्रा. एम.शिवकामी, प्राध्यापक, सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम्स स्टडीज, टीआयएसएस वंदना गेवरायकर, उपजिल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, कुमार दिलीप, अध्यक्ष, सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विस ऑर्गनायझेशन, आणि नीरजा भटनागर, राष्ट्रीय संचालक, सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विस ऑर्गनायझेशन यांचा समावेश होता.हा कार्यक्रम मुंबई प्रेस क्लब येथे पार पडला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments