प्रतिनिधी : आज एकाच वेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील 2 हजाराहून अधिक शाळांचे दोन लाख विद्यार्थी रामायण महाभारतावर आधारित परीक्षेत सहभागी झाले.एकाच दिवशी ८ एकाच वेळी संपन्न झालेल्या परीक्षांचे नियोजन आणि कार्यवाही करण्यासाठी 3000 स्वयंसेवक स्वयं स्फूर्तीने यात सहभागी झाले होते. मुंबई कोकणपट्ट्यातील 1107 शाळा, पश्चिम महाराष्ट्रातील 157 शाळा,विदर्भातील 377 शाळा आणि देवगिरी-छत्रपती संभाजीनगर पट्ट्यातील 423 शाळांचे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
शालेय विद्यार्थ्यांना रामायण- महाभारताची ओळख व्हावी,भारतीय जीवन मूल्यांचे संचित आजच्या पिढीसमोर जावे या हेतूने गेली 21 वर्ष हा संस्कार यज्ञ सुरू आहे.
सदर उपक्रम मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे.सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांना कथा पुस्तकांच्या आधारे आणि दृकश्राव्य पद्धतीने दर आठवड्याला कथाकथन केले जाते.महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या”आनंदी शनिवार”या संकल्पने अंतर्गत रामायण,महाभारत आणि संतांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या जातात. सदर उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधार म्हणून 60 गुणांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन एकाच वेळी सर्व सहभागी शाळांमध्ये करण्यात येते . परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांकाला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येते. या परीक्षेत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असून यातील अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरतात. महाराष्ट्रात सुरू झालेला उपक्रम आता देशातील 21 राज्यांमध्ये सुरू झाला आहे.या कथा पुस्तकांचे त्या त्या राज्यातील भाषांमध्ये भाषांतर करून विद्यार्थ्यांना कथा सांगण्याचा प्रयत्न होतो,अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त मोहन सालेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.