मुंबई : कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होत असलेल्या विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण यांची निवड केल्याचे साहित्य संमेलनाचे निमंत्रक लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले स्मृती साहित्य संमेलन कनेरसर येथे पार पडले होते. दुसरे साहित्य संमेलन स्वर्गीय नामदेवराव ढसाळ यांचे कर्मभुमीत होत आहे.
राजगुरूनगर येथे झालेल्या बैठकीस ज्येष्ठ साहित्यिक ॲड. प्रकाश शितोळे,कुलस्वामिनी साहित्य परिषदेचे पदाधिकारी राजुशेठ खंडीझोड,गोपीनाथ लोखंडे,संदीप म्हसुडगे,राजेंद्र शिंदे,विजय कानवडे,ज्ञानेश्वर साबळे, कुमार गायकवाड,सुरेखा टाव्हरे हे उपस्थित होते.
साहित्य संमेलनास भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी असे नाव देणार असल्याचे त्यांचे वंशज गोपीनाथ लोखंडे म्हणाले. मुंबई येथे होत असलेले साहित्य संमेलन दर्जेदार व नामदेवराव ढसाळांवर प्रेम करणारे साहित्यिक,वाचक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे ॲड प्रकाश शितोळे यांनी मत व्यक्त केले.
या साहित्य संमेलनात लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यावरील “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाच्या तिसरी आवृत्तीचे व “हायवे ऑफ डेव्हलपमेंट” या पुस्तकाच्या दुसरी आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे, तसेच संमेलन व पुस्तकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभसंदेश पत्र दिले आहे असे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.