सातारा
(अजित जगताप ) : वर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांती कडे पाहिले जाते. या सणानिमित्त अनेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश देऊन वाण सुद्धा वाटला जातो. सातारा शहरातील अनेक ठिकाणी अशी वाण वाटण्याची परंपरा आजही कायम आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे . सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.
या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. एकत्र जमलेल्या माता-भगिनी उखाणे घेतात. व एकमेकांना “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणतात. यामुळे माणुसकीचा गोडवा राहतो. अंधश्रद्धेला बगल देऊन हा सण अनेक सुशिक्षित महिला व माता-भगिनी साजरा करत आहेत. परंतु ,आता त्याचे व्यावसायिकरण करून काहीजण एका विशिष्ट रंगाच्या वेशभूषा करून हा सण साजरा करतात. त्याला कोणते लॉजिक आहे हे मात्र समजू शकले नाही.
संगम नगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला सरचिटणीस भारती काळंगे, सुनिता राजे कदम ,वंदना वनवे, श्वेता काळंगे ,शैलजा रुपलग, विजया जगदाळे, रेश्मा येवले, नीलम भोकरे व शाहूपुरी येथील गंगासागर कॉलनी मधील अनेक माता-भगिनींनी हा सण साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विशेषतः बाल चिमुकल्या मुलांनी व मुलींनी सुद्धा या सणात भाग घेऊन हिंदू परंपरा जपण्याचे काम केले आहे. पारंपारिक पद्धतीने मकर संक्रात म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म पाडण्याची शिकवण असल्याचे जेष्ठ महिलांनी सांगितले.
———————————————–
फोटो -मकर संक्रात पारंपारिक पद्धतीने साजरा करताना महिलावर्ग व तिळगुळ वाटप (छाया – निनाद जगताप, सातारा)