Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करूया उपक्रमाचा शुभारंभ;महाराष्ट्रातील मराठी भाषाप्रेमींना पत्रकार दिनी...

मराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करूया उपक्रमाचा शुभारंभ;महाराष्ट्रातील मराठी भाषाप्रेमींना पत्रकार दिनी आवाहन

मुंबई : अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे, पण हा मिळालेला दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करणं त्याहून महत्त्वाचं ठरणार आहे. दोन हजार वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली मराठी भाषा आणि तिचे साहित्य आपल्या पुढच्या पिढींपर्यंत टिकवून ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु खऱ्या अर्थाने ती आज अभिजात राहिली आहे का ? यापुढे ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व क्षेत्रातील मराठी भाषिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन दादरमध्ये काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी मालुसरे बोलत होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर चर्चा सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी दासावाचे कार्यवाह यतिन कामथे, कार्याध्यक्ष मनोहर साळवी, संघांचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कार्यवाह नितीन कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, माजी कार्याध्यक्ष नारायण परब, माजी कार्याध्यक्ष दिगंबर चव्हाण, कार्यक्रम – उपक्रम प्रमुख सुनील कुवरे, स्पर्धा प्रमुख दिलीप ल सावंत, निवृत्त मराठी भाषा संचालक परशुराम पाटील, दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ अश्विनी फाटक, सहाय्यक ग्रंथपाल पल्लवी वैद्य, वरिष्ठ ग्रंथपाल सौ अक्षरी सरवणकर व इतर सेवकवर्ग उपस्थित होते.

मालुसरे पुढे असेही म्हणाले की, अमृततुल्य, संतांची, ज्ञानवंतांची, कीर्तिवंतांची, शूरांची, वीरांची, विजिगीषू अशी आपली मराठी मायभाषा! या आपल्या अमृततुल्य मराठी भाषेस अभिजात भाषेचा बहुमान मिळणे हे सर्वच मराठीप्रेमींचे स्वप्न होते. यासाठी सर्वांनीच गेली बारा वर्षे सातत्याने प्रयत्न केले, केंद्राकडे पाठपुरावा केला. अखेर मराठी भाषेचा सन्मान होऊन ती जगाच्या पाठीवर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्यसरकारने पाठपुरावा करण्यासाठी काय मुद्दे घेऊन पाठपुरावा करावा यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक, दिवाळी अंक – मासिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, मराठी नाट्य-चित्रपट कलावंत, मराठी भाषा प्रेमी, अभ्यासक यांच्याकडून सूचना मागविण्यासाठी आवाहन पत्र तयार करण्यात आले. दिनांक ६ जानेवारी पत्रकार दिन ते २७ फेब्रुवारी २०२५ या काळात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारत सांस्कृतिक कार्य मंत्र्यालयाकडून अभिजात मराठी भाषेचा शासन निर्णय अद्याप महाराष्ट्र शासनाकडे आलेला नाही असे समजते, त्याची तातडीने पूर्तता व्हावी अशी मागणी करण्यात आली. मान्यवरांकडून लेटरहेडवर आलेल्या सर्व सुचनांचा दस्तऐवज तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचे यावेळी एकमताने ठरले. अधिक माहितीसाठी ९३२३११७७०४ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments