प्रतिनिधी : एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कंबर कसली असतांनाच त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर काल रात्री पासून सुरु झालेल्या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर आदींनी या ठिकाणी पालखी आणि पूजा करण्यात आलेल्या देव गिरोबाला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी मुंबई करांना बुद्धी दे, असे गाऱ्हाणे घातले आहे. शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल रात्री पासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजतां परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महाआरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक कै. अभिषेक घोसाळकर रंगमंच, मागाठाणे मित्र मंडळाचे संस्थापक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कै. विजय वैद्य स्वागत कक्ष तसेच या मालवणी महोत्सवात कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची रेलचेल विविध उद्योजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी आणि त्यांचा घमघमाट लोकांना आकर्षित करीत आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजतां दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली. यंदाचे २७ वे वर्ष असून रविवार, १२ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव होत आहे, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.
मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेने फुंकले रणशिंग ; महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी देव गिरोबाला घातले गाऱ्हाणे
RELATED ARTICLES