Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रपुस्तके पाहून चिमुकल्यांचे चेहरे आनंदले

पुस्तके पाहून चिमुकल्यांचे चेहरे आनंदले

तळमावले/वार्ताहर : वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात दि. 1 ते दि.15 जानेवारी या दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्याअंतर्गत दि.1 ते दि.15 जानेवारी 2025 हा वाचन पंधरवडा म्हणून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डाकेवाडीतील स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्या वतीने लहान मुलांना पुस्तके दाखवण्यात आली. मुळाक्षरे, अंक, प्राणी, पक्षी, वाहने इत्यादींची आकर्षक रंगीत चित्रे असणारी पुस्तके पाहून चिमुकल्यांचे चेहरे आनंदून गेले.
स्पंदन डाकवे, अथर्व भालेकर, तीर्था कणसे, ओवी पोळ, सौरभ नलवडे, शिवन्या बनसोडे, सारांश पाटील, सांची डाकवे या चिमुकल्या मुलांनी पुस्तके हातात घेवून आपला आनंद व्यक्त केला. डेकोरेशनसाठी फुग्यांसोबत सुप्रसिध्द मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठे छपाई असलेल्या पताका लावल्या होत्या. या पताका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे, रेश्मा डाकवे व डाकवे परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय आणि डाकवे परिवार यांच्या वतीने पुस्तकांचं झाड, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार‘ असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
याशिवाय वृत्तपत्र विक्रेता दिवसाचे औचित्य साधत स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्यावतीने डाॅ.संदीप डाकवे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मानपत्र, शाल आणि तात्या पुस्तक देवून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला होता.
डाकवे परिवारच्या वतीने वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी यापूर्वी हा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या उपक्रमांतर्गत राज्यभर महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये इ.मधून सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इ.चे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचन संस्कृती वाढविण्यामध्ये योगदान देत असलेल्या स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय आणि परिसरातून कौतुक होत आहे. अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा.

चौकटीत :
स्पर्धेच्या उपक्रमातून आकाराला येतेय वाचनालय :
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे उपक्रम राबवले जातात. यासाठी स्पर्धकांकडून तीन दिवाळी अंक आणि पुस्तकाच्या प्रती मागवल्या जातात. या तीनमधील एक प्रत सार्वजनिक ग्रंथालय, एक प्रत पुस्तकांचं झाड या उपक्रमास आणि उर्वरित वाचनालयात ठेवण्यात येते. त्यामुळे स्व.राजाराम डाकवे तात्या वाचनालय हे स्पर्धेच्या उपक्रमातून आकाराला येत असल्याची माहिती डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली. आपणही पुस्तके देवून या वाचन चळवळीत सहभागी होवू शकता. पुस्तके देणाऱ्या व्यक्तिंना सहभागाबद्दल स्पंदन ट्रस्टच्यावतीने ई-प्रमाणपत्र देण्यात येते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments