विशेष प्रतिनिधी (चंद्रकांत चव्हाण) : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, पाटण तालुक्यातील बनपुरीचे जागृत देवस्थान श्री नाईकबा यात्रेस गुढीपाडव्यादिवशी प्रारंभ झाला असून आज शनिवारी दि. १३ रोजी नैवेद्य आणी रविवार दि. १४ रोजी पालखी सोहळा होणार आहे.
त्यानिमित्त.. बनपुरीच्या दक्षिण डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे पश्चिमाभिमुखी मंदिर हे भाविकांच्या देणगीच्या सहकार्यातून आकर्षक असे मंदिर आहे. श्री नाईकबा देवाच्या बाबतीत रहस्यमय आख्यायिका आहे. जानुगडेवाडीतील जानुगडे भावपणात तीन भाऊ व एक बहीण असे कुटुंब होते. त्या बहिणीचे नाव होते कृष्णामाई. ती गुरे चारण्यासाठी बनपुरी च्या डोंगरावर जात असे. गुरांच्या कळपातील काळ्या रंगाची कपीला नावाची कालवड तिची नजर चुकवून रोज एका मोठ्या दाट जाळीच्या आत जात असे. हे कृष्णामाईच्या ध्यानात आल्यानंतर तिचा पाठलाग करत ती धाडसाने त्या दाट झाडीमध्ये गेली. त्यावेळी ती काळी कपीला गाय एका मोठ्या शिलावर दुधाच्या धारा सोडत होती. त्यावेळी साक्षात श्री नाईकबा देवाने तिला दर्शन दिले. गुरे घेऊन ती घरी निघाली व एक छोटी टेकडी उतरून खाली आली. त्यावेळी तिला मोठा गडगडाट ऐकू आला. आवाज ऐकूण ती घाबरली व तिने मागे वळून पाहिले असता, ती शिला अंगावर येत असल्याचे दिसून आले. तिने घाबरत शिलेला हाताचा स्पर्श होताच ती शिला तेथे थांबली व दुभंगली गेली. त्या शिलेतून श्री नाईकबा स्वयंभू शिव पिंडीसारखी मूर्ती प्रकटली व तेजाने झळकू लागली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
चैत्र पाडव्यापासून येथील यात्रेला सुरूवात होते. चैत्र शुक्ल पंचमी, षष्टीला मोठी यात्रा भरते. गुढीपाडव्यावेळी कराडच्या काका शिंदे यांची मानाची सासनकाठी श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विलासराव जानुगडे पाटील यांच्या जानुगडेवाडी येथील घरी येते त्याठिकाणी जानुगडे कुटुंबांच्या वतीने सासनकाठीचे सनई वाद्याच्या गजरात स्वागत करून नैवेद्य दाखवून पूजन केले जाते नंतर ही मानाची काठी जानुगडेवाडी येथून श्री क्षेत्र बनपुरी येथील नाईकबा डोंगरावर प्रस्थान करते व त्यानंतर अनेक सासनकाठ्या श्री नाईकबा डोंगरावर येतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, कुरूंदवाड विभागातून आलेल्या सुमारे ४0 ते ५0 सासनकाठ्या व पालख्यांचा समावेश असतो. आज रविवार नैवेद्याचा दिवस असून रविवारी दि. १४ रोजी पहाटे पालखी सोहळा आहे. ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांसह श्री नाईकबाचा छबिना निघतो. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची मोठी गर्दी होत असते.