
प्रतिनिधी : प्रख्यात अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताला आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग दाखवला. आव्हानात्मक काळात त्यांनी भारताला अत्यंत आवश्यक असलेले आर्थिक नेतृत्व, जागतिक मान्यता, स्थिरता आणि एकता प्रदान केली. उगवत्या भारताच्या इतिहासात एक अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांचे योगदान कायमचे कोरले जाईल. डॉ. मनमोहनसिंग यांचा वारसा परिवर्तनशील नेतृत्वाचा आहे, जो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहिल.
डॉ. मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थमंत्री अशा विविध पदावर आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक बाबतीत जगात त्यांच्या ज्ञानाचा दबदबा होता अशा या महान व्यक्तीच्या निधनाने काँग्रेस पक्षाची व देशाची मोठी हानी झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने डॉ. मनमोहनसिंग यांना खासदार वर्षा गायकवाड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.