मुंबई – बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही व करणार नाही. तसेच या ठिकाणी समाजवादी पार्टीने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बजरंग सोनावणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही बीडमधील मुजम्मिल पटेल यांनी समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष असल्याचा खोटा दावा करून खोडसाळपणे चुकीच्या बातम्या प्रसिद्धीस दिल्या आहेत. मुजम्मिल पटेल यांचा इ.स. २०१९ नंतर समाजवादी पार्टीशी कोणताही संबंध राहिलेला नाही व त्यांचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पद इ. स. २०१९ मध्येच संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीच्या वतीने कोणतेही पत्रक काढण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही.” अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जाहीर पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिलेली आहे.
“बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी म्हणून एड. शिवाजीराव कांबळे, अंबाजोगाई यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यासंदर्भातील सर्वाधिकार एड. शिवाजीराव कांबळे यांना आहेत. तसेच मराठवाड्यामध्ये पक्षाच्या वतीने राज्य महासचिव व प्रवक्ता एड. रेवण भोसले उस्मानाबाद, राज्य महासचिव डॉ. शेख राऊफ औरंगाबाद, आणि राज्य उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांना लोकसभा निवडणुकांसंदर्भात सर्व बाबतीत आवश्यक ते निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत.” अशीही माहिती प्रताप होगाडे यांनी दिली आहे.
“या वेळची लोकसभा निवडणूक या देशाचे संविधान वाचवण्यासाठी, देशातील अघोषित हुकूमशाही आणि येऊ घातलेला मनुवादी फॅसिझम नष्ट करण्यासाठी आहे. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, शेतकरी महिला दलित अल्पसंख्याक आदिवासी यांच्यावरील अन्याय अत्याचार या जनतेच्या मूलभूत व दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. या विचाराशी बांधील असलेली समाजवादी पार्टी संपूर्ण ताकतीने या निवडणुकीमध्ये भाजपा सरकारला हद्दपार करण्यासाठी काम करील. समाजवादी पार्टी इंडिया आघाडीचा घटक पक्ष असून उत्तर प्रदेशमध्ये मा. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी सर्वाधिक ६२ जागा लढवित आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये पक्षाचा उमेदवार नसला तरीही राज्यातील सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय राज्य कार्यकारीणी बैठकीत एकमताने घेण्यात आलेला आहे” अशीही माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
समाजवादी पार्टीचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उमेदवारास पाठिंबा. -स.पा. कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांची माहिती
RELATED ARTICLES