प्रतिनिधी : परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना व भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस अटकेत झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या घटनांची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत माटुंगा लेबर कॅम्प कृती समितीने या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला. याबाबत शाहूनगर पोलिसांना निवेदन देण्यात आले.

समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. संविधान प्रतिकृतीचा अपमान आणि कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई केली पाहिजे. या संदर्भात मुंबईतील विविध भागांमध्ये विभाग बंद, मोर्चे आणि धरणे-निदर्शने आयोजित करून लोक आपला आक्रोश व्यक्त करत आहेत.
माटुंगा लेबर कॅम्प विभागातील नागरिकांचीही भावना तीव्र असून या घटनांविरोधात शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेत शनिवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून लेबर कॅम्प नाका येथे बहुसंख्येने एकत्र येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शाहूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांना निवेदन देण्यात आले. समितीने या घटनांबाबत न्यायालयीन निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.
