सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडून आलेले सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघातील आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. ही आनंदाची बाब आहे. या चार मंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते व सर्वसामान्यांची गर्दी होणार आहे. या गर्दीचे मार्केटिंग करून आपले हित साध्य करण्यासाठी काहींनी दीप प्रज्वलन तर काहींनी आपलं रांजण रीत करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा होऊ लागलेली आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण- खटावचे आ. जयकुमार गोरे, पाटणचे सुपुत्र व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, वाई- महाबळेश्वर- खंडाळ्याचे मकरंद पाटील असे चार दिग्गज अनुभवी आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. खऱ्या अर्थाने आतापर्यंत मंत्रिमंडळात एक धाव घेतली जात होती. .परंतु, कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे यांच्या कृपेने चौकार मारला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता विकास कामे वेगाने होतील. याची आता खात्री पटू लागलेली आहे.
गेले वीस ते पंचवीस वर्ष या मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद सदस्या पासून ते आमदार आता मंत्री असे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या चारही मंत्र्यांनी आपले स्थान बळकट करताना सामान्यांची काळजी घेतलेली आहे. परंतु, नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेला ज्यांनी विकास कामे पोहोचवली आहेत. त्यांचाही या यशामध्ये वाट आहे. वाड्यावस्तीत जावून पदयात्रा, कोपरा सभा, व मतदारांच्या गाठीभेटी घेतलेली आहेत. अशा सामान्य कार्यकर्त्याकडे दोन नंबरची धनसंपदा नसल्यामुळे त्यांना नागपूरला जाण्यास अडचणी निर्माण झाल्या. याउलट कमवा आणि शिका शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी आलिशान वाहने व विमानाने नागपूर गाठले आहे . आपापल्या फायद्याच्या आरक्षणाची तजवीज केलेली आहे. अशी ही अधिकृत माहिती हाती आली आहे. आता मंत्री महोदय हे चार चौघांचे राहिले नसून सामान्यांचे मसीहा झालेले आहेत. याची त्यांना आठवण करून देण्यासाठीच ही सामान्यांची गर्दी होणार आहे. जे सामान्य स्वतः फटाके वाजवणार ,गुलाल उधळणार, घोषणाबाजी करणार, एवढेच नव्हे तर कष्टाने बॅनर बांधण्यासाठी स्वतः खड्डे खणणारे व स्वतः वाहन चालवून येणार तेच खरे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.
सातारा जिल्ह्या प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ नगरीच्या हद्दीतील नीरा नदीच्या तीरावर काही सामान्य हे मिळेल त्या वाहण्याने व एस.टी. बसने शिरवळ या ठिकाणी जाणार आहेत. त्यांचे स्वागत स्वीकारणे म्हणजे सामान्य सोबत असल्याचे मंत्र्यांनी दाखवून द्यावे. असाही सुर उमटत आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे दिवाळी अंकासारखे रेट कार्ड चर्चेचा विषय झालेला आहे. या बाबत काहींची नावे उघडपणे उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यातील कामगारांनी घेतलेली आहेत . त्याच्या बातम्याही काही वृत्तवाहिनीवर दाखवल्या जात आहेत. अशांचा वसंत फुलवण्याऐवजी रानमाळावर स्वतःच्या कष्टानेच उमलणाऱ्या फुलं खऱ्या अर्थाने कास पठाराची शोभा वाढवत आहेत. अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे. कारण, अनेकांनी आपल्या जमिनी देवून धरणग्रस्तांचे पुनर्वसन घडवून आणले आहे. तर काहींनी धरणासाठी आपल्या जमिनीचा त्याग केलेला आहे. अशा दोन्हीही शेतकऱ्यांना व भूमिपुत्रांना न्याय देणे हे कर्तव्य समजून चारी मंत्री महोदयांनी काम करावे. कारण, ज्यांच्याकडे बॅनर ,कट आउट लावण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यांना सुद्धा एक मत देण्याचा अधिकार आहे. व जे बॅनर बाजी करतात. त्यांनाही एक मताचा अधिकार आहे. याचा कधी विसर पडू नये. अशी भावना व्यक्त करून अनेक सामान्य माणसं चारही मंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे चित्र आतापासूनच दिसत आहे.
फोटो -सातारा जिल्ह्याच्या हद्दीत चार मंत्र्यांच्या स्वागतासाठी अशी सामान्यांची गर्दी होणार (छाया- अजित जगताप सातारा)
