Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रदादर रेल्वे स्टेशनजवळचे हनुमान मंदिर हटवाल तर याद राखा! मुंबईकर हे कदापी...

दादर रेल्वे स्टेशनजवळचे हनुमान मंदिर हटवाल तर याद राखा! मुंबईकर हे कदापी सहन करणार नाही – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत मंदिरांवरही बुलडोझर चालवला जात असून भाजपाचा हा विध्वंसक बुलडोझर आता श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी निघाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात देवही ‘सेफ’ नाहीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका मित्रच ‘सेफ’ आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.

यासंदर्भात संताप व्यक्त करत खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, दादर रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांजवळ एका कोपऱ्यात बांधलेल्या ८० वर्ष जुन्या हनुमान मंदिराची भाजपाला काय अडचण झाली? हे मंदिर दादर रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी बांधले आहे. हे हनुमान मंदिर मुंबईतील कष्टकरी लोकांच्या आस्थेचे प्रतीक आहे. मात्र भाजपच्या बुलडोझर राजवटीत हे मंदिर पाडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वीही पुनर्विकासाच्या आडून गिरगाव येथील ठाकूरद्वारचे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर आणि मलबार हिल, ताडदेव, खेतवाडी परिसरातील ७ ते ८ प्राचीन मंदिरे तोडण्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. भाविकांच्या आस्थेशी खेळू नका मुंबईकर आणि काँग्रेस हे कदापी सहन करणार नाही आणि भाजपाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे.

दादर रेल्वेस्टेशन जवळील हनुमान मंदिर तोडण्याची नोटीस देईपर्यंत भाजपा सरकार काय झोपले होते काय? भाजपाचे पितळ उघडे पडले म्हणून सारवासारव करण्यासाठी भाजपाचे काही भोंगे काल दिवसभर प्रवचन देत होते पण मंदिराला नोटीस पाठवेपर्यंत हे भोंगे कुठल्या बिळात लपले होते. आता भाजपाचे काही नेते दादरच्या हनुमान मंदिराला भेट देत आहेत पण त्याचा काही उपयोग नाही. भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला असून भाजपाच्या राज्यातच मंदिरांवर सर्वात जास्त कारवाया झाल्या आहेत, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments