Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रघरच्या "अदृश्य हाताने" केला वैभव नाईकांचा पराभव

घरच्या “अदृश्य हाताने” केला वैभव नाईकांचा पराभव

मालवण :- कणकवलीतील नाईकांच्या घरात असलेला पिढ्यानपिढ्याचा संघर्ष आता उफाळून बाहेर आला आहे. याच संघर्षातून कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा “करेक्ट कार्यक्रम” करण्यात आला आहे. घरच्या अदृश्य हाताने नाईकांचा पराभव केल्याची चर्चा कोपऱ्या कोपऱ्यावर सुरु आहे.

श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक यांनी श्रीधर नाईक कुटुंबाला आसरा दिला, आधार दिला आणि त्या कुटुंबाचा सांभाळ केला. पण आज त्यांचाच मुलगा सुशांत नाईक याने वैभव नाईक यांच्या म्हणजेच विजय नाईक यांच्या कुटुंबाच्या विरोधात काम सुरु केलेलं आहे.

या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांचे कडवे आव्हान असताना सुशांत नाईक भावाला मदत करण्याऐवजी स्वतःसाठी कणकवली विधानसभेत उमेदवारी मागत होता. बाजूच्या विधानसभेत भाऊ वैभव नाईक संकटात असताना कणकवली मधून स्वतःच्या उमेदवारीचा आग्रह धरणे म्हणजेचं “खाल्ल्या ताटात घाण” करण्याचा प्रकार सुशांत नाईकांनी सुरु केला. आणि हे राजकारण खेळण्यासाठी त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना हाताशी धरले. शेवटी वैभव नाईकांच्या कुटुंबाला सुशांत नाईक यांना आठवण करून द्यावी लागली, “जर आम्ही नसतो तर तुम्हाला हे आजचे दिवस पाहायला पण मिळाले नसते.”

घरातून डोस मिळाल्यानंतर वरकरणी शांत झालेला सुशांत नाईक आतमधून करामती करायचा काही थांबला नव्हता. आपल्या बँक संचालकपदाचा वापर करून सुशांत नाईक याने राणे यांच्या जवळच्या एका बँक संचालकाशी संपर्क साधून कुडाळ मालवण मधील वैभव नाईक यांची अंतर्गत निवडणूक रणनीतीची माहिती राणे यांना द्यायला सुरु केली. आणि त्याचा परिणाम असा झाला वैभव नाईक यांच्या प्रत्येक मिनिटाची खबर राणे यांच्यापर्यंत पोचायला लागली. आणि त्यामुळे २०१४ ला जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईक यांना २०२४ ला पराभव बघायला लागला. घरची सुंदोपसुंदीच वैभव नाईक यांना भोवली.

सिंधुदुर्गातील उबाठा गटात अंतर्गत धुसफूस होतीच, पण एकमेकांचे उट्टे काढायचे आणि एकमेकांची जिरवायची कशी, याची सुरुवात लोकसभेपासून झाली. आपला राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी त्यावेळचे आमदार वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आणि कुडाळ मालवण मधून खासदार नारायण राणे यांना २८ हजारांचे लीड मिळाले. स्वतःच्या निवडणुकीत ८ हजार मतांनी पराभूत झालेल्या नाईक यांनी तब्बल २० हजार मते राणे यांच्या बाजूने फिरवली आणि आपल्या वाटेतील काटा विनायक राऊत यांना कोकणच्या राजकारणातून हद्दपार केले. तशीच मदत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेत संदेश पारकर यांनी नारायण राणे यांना केली. आपल्याला दिलेल्या लाल दिव्याच्या गाडीची जाण ठेऊन संदेश पारकर यांनी लोकसभेला नारायण राणे यांना मदत केली. नाईक-पारकर या जोडीने ठरवून विनायक राऊत यांचा लोकसभेला गेम केला.

आता वैभव नाईकांच्या पराभवानंतर सुशांत नाईक, विनायक राऊत तोंड भरून हसत आहेत. राजापूरमध्ये राजन साळवी यांची लंका लावल्यानंतर विनायक राऊत यांनी कुडाळात वैभव नाईक यांचा लोकसभेचा हिशोब पूर्ण केला आहे. आता सुशांतचा पुढचा मार्ग मोकळा झाला आहे का, हे येणारी वेळच ठरवेल. आणि विजय नाईक यांचे सुपुत्र आपल्या पराभवाचा वचपा येणाऱ्या काळात काढणार का? हे येणारा काळच ठरवेल !

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments