Oमुंबई,(प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्या आणि बोरीवली येथील पत्रकार नेहा पुरव यांनी भेट घेतली त्यावेळी बोरीवली येथे आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधावा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष आणि दैनिक भास्कर चे विशेष राजकीय प्रतिनिधी विनोदकुमार यादव यांना आमदार संजय उपाध्याय आणि पत्रकार यांच्या मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांसमवेत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी परखडपणे भूमिका मांडतांना सांगितले की, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वेळेत येण्याची गरज आहे. पत्रकारांना गृहीत धरण्यात येऊ नये. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली २०११ साली दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड आणि मागाठाणे या सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या क्षेत्रातील सर्व भाषिक पत्रकारांसाठी उत्तर मुंबई पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. हा संघ नोंदणीकृत सुद्धा आहे. सुमारे दीडशे दोनशे पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन उभारण्यात यावे. ही भव्य वास्तू सभागृह, समिती कक्ष, उपहारगृह, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पत्रकारांसाठी वास्तव्य करण्याची व्यवस्था, बॅंक आदी सुविधांनी सुसज्ज असावी, अशी आमची मागणी आहे. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असतांना राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर भव्य पत्रकार भवन आहे. मात्र मुंबई उपनगरात असे भवन नाही. उत्तर मुंबई पत्रकार संघाने तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी यांना या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून आमची मागणी पुढे रेटली. जागाही आहे. आता आपण पाठपुरावा करा. आपणच भूमिपूजन करा आणि उद्घाटन आपणच करा. याचा उपयोग लोकप्रतिनिधींनाच जास्त होऊ शकतो. आमदार संजय उपाध्याय यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन म्हणजे हॉटेल घेण्याचीही गरज भासणार नाही. त्या पत्रकार भवनातच आपण भेटून संवाद साधू शकतो, असे स्पष्ट केले. उपस्थित सर्व पत्रकारांनी या भूमिकेचे स्वागत केले. आमदार संजय उपाध्याय यांच्या धर्मपत्नी सौ. नीलम संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, निरंजन शेट्टी, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, कुनेश दवे, दीपक भातुसे, मनोहर कुंभेजकर, मयुर परीख, अभय मिश्रा, राजकुमार सिंह, दत्ताराम घुगे, नीलाबेन सोनी, श्याम कदम आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य ; आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही
RELATED ARTICLES