प्रतिनिधी (रमेश औताडे) : माढा लोकसभा मतदार संघात प्रस्थापितांची असलेली मसल पॉवर मनी पॉवर आमचा ओबीसी उमेदवार संपवणार असल्याचा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचे प्रश्न घेऊन लढणारे संजय हाके यांनी बहुजन समाजाचे प्रश्न अनेक वेळा मांडून सोडवले आहेत.कुणालाही भिडण्याची तयारी त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यांनी उध्दव ठाकरे गटातून प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन आमच्या ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश केला असून त्यांना आम्ही माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे असे प्रकाश शेंडगे यांनी यावेळी जाहीर केले.
माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी पुन्हा घराणेशाई समोर आली आहे. मात्र या भागात ओबीसी समाज ७० टक्के आहे. याचा फायदा आता संजय हाके यांना होणार आहे. पाटील व निंबाळकर घराणे सामान्य माणसाचे कोणते प्रश्न घेऊन लढले आहेत ? आजही सर्व प्रश्न, समस्या आहे तशाच आहेत. त्या आता संजय हाके पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे.असे शेंडगे यांनी सांगितले.
उत्तर मध्य मुंबईतून शांताराम दिघे, लातूर मधून पंचशील कांबळे, अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा तर यवतमाळ मधून अनिल राठोड, नांदेड मधून सुरेश राठोड असे आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत. नाशिकची उमेदवारी छगन भुजबळ यांना दिली तर ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा राहणार असल्याने त्यांचा विजय नक्की आहे. आमची धन पेटी खाली आहे मात्र आता मत पेटी भरणार आहे.असे शेंडगे यांनी सांगितले.
यावेळी संजय हाके म्हणाले, धन दांडगे लोकसभेच्या सभागृहात जातात मात्र धनगर समाजाचे किती खासदार लोकसभेच्या सभागृहात गेले. मात्र आता प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीमुळे कुणाच्या दरात तिकीट मागायला जाण्याची गरज नाही.कोस्टल रोड, अटल सेतू, गगनचुंबी इमारती असा आडवा उभा विकास होत असताना जमिनीवरील समांतर पालात आमचा गोरगरीब समाज राहत आहे यासारखे दुर्दैव नाही असे संजय हाके यावेळी म्हणाले.
.