प्रतिनिधी (रमेश औताडे) : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा एकोपा जो आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे.
आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे, असा सवाल आंबेडकर यांनी मोहन भागवतांना केला.
या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते.
त्यामुळे भाजप संपला आहे अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. 30 टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील तसे मतदान करणार आहे.
.