मुंबई(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय झालेल्या विधानसभा निवडणूक संपली निकाल जाहीर झाला. सरकार स्थापन झाले पण अद्यापही मंत्रिमंडळ होऊ शकलेले नाही. ती प्रतीक्षा आता दोन दिवसात संपणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते मुंबई ठाण मांडून बसले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या २८८ आमदार आहेत यामध्ये महायुतीचे २३६ महाविकास आघाडीचे ४९ आणि अपक्ष तीन असे २८८ आमदार आहेत यामध्ये भाजप १३२ शिवसेना शिंदे गट५७ राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ राष्ट्रीय काँग्रेस १६ राष्ट्रवादी शरद पवार गट १० शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २० समाजवादी २ जन स्वराज्य पार्टी २ राष्ट्रीय समाज पक्ष १ व इतर ३ असे पक्षीय बलाबल आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार यांनी शपथविधी घेतला. त्यानंतर विशेष अधिवेशनात आमदारांचाही शपथविधी झाला. परंतु, आद्यपही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेक सत्ताधारी पक्षातील आमदार व त्यांचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत.
तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असलेल्या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण ,राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, संजय कुटे, आशिष शेलार, देवयानी फरांदे, पंकजा मुंडे निलेश राणे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव चर्चेत आहेत . अजित दादा पवार गटाचे राष्ट्रवादी आमदार राजकुमार बडोले, धर्मराव बाबा आत्रम, दत्ता मामा भरणे, छगन भुजबळ, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दौलत दरोडा व मकरंद पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील ,दादा भुसे, भारत गोगावले, संजय राठोड, संजय शिरसाट, उदय सामंत, प्रताप सरनाईक डॉक्टर तानाजी सावंत, दीपक केसरकर, राजेश क्षीरसागर, भावना गवळी, मनीषा वायकर यांच्या नावाची समाज माध्यमावर चर्चा आहे. पक्षीय पातळीवर सुद्धा त्यांच्याच नावाची शिफारस केल्याचे पक्षाच्या जबाबदार व्यक्तींनीही खुली चर्चा करताना दुजोरा दिलेला आहे.
वास्तविक पाहता महायुतीने निर्विवाद बहुमत निर्माण केले आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. सध्या तरी महामंडळाकडे अध्यक्ष पद घेण्यासाठी काही आमदार वगळता वजनदार आमदार इच्छुक नाहीत. त्यांची समजूत काढण्यासाठी तसाही प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पक्षालाही पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु तो आता महायुतीचा बालेकिल्ला झाल्यामुळे प्रस्थापित घराण्यातील आमदार व सामान्य कुटुंबातील आमदार यापैकी भाजप पक्षासाठी नाकापेक्षा मोती जड होऊ नये. याची खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. काही वजनदार आमदारांच्या समर्थकांनी जुने संदर्भ देत मंत्रिमंडळ शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अनेकांची उत्सुकता शिंगेला पोहोचली असली तरी गुलालाची पोथी आणून पडलेली आहेत. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. दरम्यान, समाज माध्यमावर अनेक जण आपल्या नेत्यांना मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी खात्री देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही फ्लेक्स तयार करणारे व्यावसायिक उधारी वर फ्लॅक्स बनवण्यास नकार देत असल्याचे पुढे आले आहे.
मंत्रिमंडळाच्या शपथविधी प्रतीक्षा दोन दिवसात संपणार
RELATED ARTICLES