मुंबई (रमेश औताडे) : कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा असा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे. त्यामुळे जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.
आजमितीस बेस्ट ताफ्यातील ३ हजार बेस्ट बसेसपैकी २ हजार बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसेस चा पुरवठा करणारा कंत्राटदारच बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की कंत्राटदाराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात. आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे.
केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर प्रवासी संघटना सहन करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात देण्यात आले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे कंत्राटी पद्धतीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असून बेस्ट महाव्यवस्थापकानी याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.