मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वानवली उतेकर गावचे सुपुत्र व एमएसएफचे जवान अमोल राजाराम उतेकर यांनी बोरीवली रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून एका महिलेचे प्राण वाचले आहेत. धावती लोकल पकडताना महिलेचा तोल गेला अन महिला प्लटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली. याच क्षणी ड्युटीवर तैनात असलेल्या एमएसएफ जवानाने आपला जीव धोक्यात घालून महिलेचे प्राण वाचवले. दि.९ डिसेंबर सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. बोरीवली रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर बोरीवली ते चर्चगेट लोकल थांबली होती. याच वेळी एका महिला लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावली मात्र, इतक्यात लोकल सुरू झाल्याने सुरू झालेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात महिला तोल जाऊन खाली पडली.याच वेळी स्थानकावर कार्यरत असलेले एमएसएफ जवान अमोल राजाराम उतेकर यांचे महिलेकडे लक्ष गेले. त्यावेळी जवान अमोल उतेकर यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचा ही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली आणि पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर ओढले. जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. महिलेला कुठे दुखापत झाली याची विचारपूस केली, सुदैवाने महिला आणि जवान सुखरूप आहेत. या घटनेचा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जवान अमोल उतेकर यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल स्थानकावरील नागरिकांनी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांचे कौतुक केले.
धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलेचा तोल गेला; मात्र सातारच्या जवानाने तिचे प्राण वाचवले
RELATED ARTICLES