सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात विशेषता छत्रपतींचे वंशज आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी निश्चित झालेली आहे .हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी सातारा तालुका शहर व परिसरातील सुमारे हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अरुण पवार व सातारा जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत तसेच संचालिका सौ कांचन साळुंखे, लक्ष्मणराव धनावडे, दत्ता गावडे, श्रीहरी गोळे यांनी दिलेली आहे.
राज्यातील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाचे इतर घटक पक्ष यांच्या महायुती राज्य सरकारचा मुंबईमध्ये शपथविधी होत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ मुख्यमंत्रीपदी मिळाला. त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीने महाराष्ट्रात घवघवीत यश संपादन केले आहे. विकास कामासोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रभाव मतदानात झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशा प्रकारची कबुली ही वरिष्ठ महायुतीचे नेते देत आहेत.
भाजपा हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरल्यामुळे महत्त्वाची मंत्रिमंडळातील खाते भाजपकडे येणार आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती या ठिकाणी महायुतीच्या शिरकाव करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झालेले आहे. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीने विजय संपादन केलेला आहे. त्यामुळे या शपथविधीला अनेकांचे उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.
भाजपने नवीन सभासद नोंदणी सोबतच पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. याकडे अनेक मान्यवरांचे लक्ष लागलेले आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज असले तरी त्यांनाही या नवीन निवडीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. असे माहितीगारांनी सांगितले.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदर मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे नवीन मंत्रिमंडळाची शपथविधी संपन्न होणार आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांची खूप मोठी गर्दी होते. त्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम हा दि. पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदान येथे घेतला आहे .
या शपथविधी सोहळ्याची तयारी महायुतीच्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशाने होत आहे. कारण, त्यांनी दोन वेळा या ठिकाणी शिवसेनेच्या दसरा मेळावा यशस्वी करून दाखवला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेवी वेट नेते अजितदादा पवार, शिवसेनेचे शंभूराजे देसाई, दीपक केसरकर,भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंगल प्रभात लोढा व मान्यवर मंत्री महोदय शपथविधी घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सातारा शहर व सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील मुंबई निवासी तसेच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे काही कार्यकर्ते हे या शपथविधीसाठी उपस्थित राहून नूतन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शुभेच्छा देणार आहेत. त्याचबरोबर ती सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार करण्याची ही योजले आहे. पुढील महिन्यात नववर्षाच्या स्वागता सोबतच नूतन मंत्री महोदयांच्या सत्कार असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फोटो – महायुतीच्या शपथविधीसाठी आजाद मैदानावर झालेली तयारी (छाया- निनाद जगताप, मुंबई)