प्रतिनिधी(रमेश औताडे) : सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ अमोल हेंद्रे यांच्या थरारक छायाचित्रांचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा झेंडा श्रीलंकेत फडकवला जाणार आहे.
20, 21 एप्रिल 2024 रोजी कोलंबो येथील ‘ गॅलरी फॉर लाइफ ‘ येथे आणि 27 ते 31 मे 2024 रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावासाच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अमोल हेंद्रे यांनी भारत, श्रीलंका, केनिया, इंडोनेशिया या देशातील जंगलात गेली वीस वर्षांहून अधिक काळ भटकंती केली आहे. यावेळी विशेष करून त्यांनी वाघ, सिंह, बिबटे अशा जंगली श्वापदांची छायाचित्रे आपल्या कॅमेराच्या चौकटीत टिपली आहेत. या वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांचे प्रदर्शन सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवले आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने बोलताना अमोल हेंद्रे म्हणाले, ” श्रीलंका दूतावास अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच आयोजित करत आहे. त्यांनी हा मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भारत श्रीलंका या दोन देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यासाठी पर्यटन हे चांगलं माध्यम आहे. यामुळे दोन्ही देशातील पर्यटन व्यवसायाला उत्तेजन मिळू शकते. भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेत जावं व तिकडच्या पर्यटकांनी भारतात यावं आणि स्थानिक पर्यटन स्थळांचा आस्वाद घ्यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. या देवाणघेवाणीच्या उपक्रमासाठी त्यांनी माझी निवड केली आहे हा माझा आणि आपल्या भारत देशाचा सन्मान आहे, असं मी मानतो.