सातारा(अजित जगताप) : सर्वसामान्य माणसांच्या खाद्यपदार्थाची लाडकी वस्तू म्हणजे कांदा होय .कांदा आता किलोच्या दराने शतक साजरा करण्यासाठी उतावळा झालेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांच्या कांद्याच्या दरातील मताधिक्यातही तेजी आल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद कांदा प्रसिद्ध आहे. शेतकरी वर्ग कांद्याला दर कमी झाला की,कांदे रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त करत होते. कारण दर पडले होते. आता कांद्यावरील साल काढताना सुद्धा ग्राहक वर्ग विचार करू लागलेले आहेत. आज कांद्याने दरामध्ये चांगलाच विक्रम केला आहे . हे शेतकरी वर्गासाठी सुखद बाब आहे.
शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे. याबद्दल कुणाचे दुमत नाही. कांदा आणखीन महाग झाला तरी काही बिघडत नाही. कारण, निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांनी पैशाचा वारे माप वापर केला. त्यावेळी कुणालाही महागाईची आठवण झाली नाही. असे परखड मत शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, सोन्या साबळे व धनसिंग जाधव यांनी व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सब घोडे बारा टक्के.. निवडून आले सर्वेच पक्के…… हे सुद्धा सातारकरांनी पाहिले आहे.कांदा खाद्यपदार्थामुळे सातारा जिल्ह्यात रस्त्यावर टपरी व स्टॉल टाकून किमान १२ हजार ते १५ हजार कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. कांदा भजी तसेच मिसळ आधी तयार करून विकणाऱ्या अनेक माता-भगिनी यांना खरं म्हणजे कांदा हा अन्नदाता आहे. आज कांदा महाग झाल्यामुळे काहींना कांद्याबद्दल वेगळा विचार करावा लागत आहे. बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थाने कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांदा उत्पादन बाहेर येण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी आहे. तो पर्यंत कांद्याचे किलोच्या दराचे शतक साजरे होणार आहे. अगदी टाकाऊ कांदा सुद्धा २५ ते ३५ रुपयाने घेण्यासाठी काही गरिबांची झुंबड उडत आहे.
साताऱ्यातील नामांकित हॉटेलमध्ये कांद्या ऐवजी कोबी दिला जात आहे. एरवी ग्राहकांकडून भरमसाठ कमाई करून सुद्धा कांदा महाग झाल्यामुळे काही नामांकित हॉटेल मालकांनी कांद्याचे डिपॉझिट जप्त केल्यासारखे कांदा दिसानसा झालेला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
कांदा आणि लसूण हा सर्वसामान्य कुटुंबातील प्रमुख आहार आहे. तर काहीजण कांदा व लसूण खात नाहीत त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतकीच असावी. त्यांना कांदा महाग झाला किंवा स्वस्त झाला त्याबद्दल काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळावा. असे सांगणारे सुद्धा आता कांद्याचे दर वाढल्याबद्दल टाहो फोडत आहे. अशा दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकांना कधीही सामाजिक देणे घेणे नाही. त्यांना फक्त व्यवसाय वाढीसाठी लक्ष केंद्रित करावे लागते. हा त्यांचाही दोष नसल्याचे बोलले जात आहे. शेवटी मानवतेपेक्षा पैशाला महत्व आल्यामुळेच आता प्रत्येक दरवाढ ही निवडणुकीच्या मताधिक्यासाठीच वाढणार असल्याचे अंदाज राजकीय निरीक्षक करत आहेत.
कांद्याचे रोप तयार करण्यासाठी दोन आठवडे लागतात. तर कांदा पूर्ण तयार होण्यासाठी तीन ते पाच महिन्याचा कालावधी लागतो. कांद्याला दर जास्त मिळत असल्याने शेतकरी वर्ग सर्वत्र कांद्याची लागवड केल्यानंतर कांद्याचे भाव घसरतात. याचाही शेतकऱ्यांनी विचार करावा. असे शेतकरी सांगू लागलेले आहेत. सध्या कांद्याची भाजी सुद्धा दरवाढीने परवडत नाही. असे सांगणारे दररोज वायफळ खर्च करतात. हे सुद्धा त्यांच्या लक्षात येऊ लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे दिल्याचा आनंद वाटत असल्याचे सांगत आहे.
