Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रहा एकजुटीचा महाविजय!...पक्षाच्या विजयसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना

हा एकजुटीचा महाविजय!…पक्षाच्या विजयसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना

प्रतिनिधी : ‘एक है तो सेफ है’ असा संदेश देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जाणीवा जाग्या केल्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, तसेच संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने झटून काम केले, संत, विविध  पंथांच्या परंपरेने जनजागृती करून खोट्या प्रचाराचा मुखवटा फाडला. महिला, युवा, शेतकरी आणि सामान्य जनतेने प्रचंड विश्वास दाखविला, म्हणून महायुतीला हा महाविजय मिळाला आहे. या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी त्यांना साष्टांग दंडवत घालतो, असे भावपूर्ण उद्गार भाजपाचे नेते व महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयसभेस संबोधित करताना काढले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस  विनोद तावडे, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे कवाडे आदी उपस्थित होते.

आजचा दिवस अभूतपूर्व असून महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखविला आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून फडणवीस म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले आहे. हा दणदणीत विजय मिळवून देणाऱ्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात लढाई सुरू केली, पण लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटिव्ह प्रभावी ठरल्याने आम्ही पुरेसे यश मिळवू शकलो नाही, याची खंत आम्हाला होती. म्हणूनच, ही उणीव विधानसभेत भरून काढून फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याचा निर्धार केला. आमच्या राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी हा नरेटिव्ह उद्धवस्त करण्यासाठी व अराजकतावादी शक्तींना रोखण्यासाठी पुढे येऊन राष्ट्रवादाचाच विजय होतो हे दाखवून दिले. या परिवारातील सर्व संघटनांनी मदत केली, लाडक्या बहिणींनी आशीर्वाद देऊन ‘छप्पर फाड के’ यश मिळवून दिले. शेतकऱ्यांनीही आम्हाला आशीर्वाद दिला, फेक नरेटिव्ह धुडकावून लावला. ‘एक है तो सेफ है’, हा पंतप्रधान मोदी यांचा संदेश समाजातल्या सगळ्या लोकांनी समजून घेतला, आणि एकत्रित होण्याची गरज ओळखून महायुतीला मतदान केले, असे फडणवीस म्हणाले.

व्होट जिहाद, तुष्टीकरण, विशिष्ट समाजाला एकत्र करून निवडणुका जिंकण्याच्या वल्गना या राज्यात केल्या जात होत्या. पण संतांच्या, वेगवेगळ्या पंथांच्या परंपरा असलेल्या महाराष्ट्राने एकमुखाने जागृती केली, आणि त्यास प्रतिसाद देऊन महाराष्ट्राने महायुतीसाठी मतदान केले. देव, देश धर्माच्या लढाईत उतरून स्वत्व टिकविण्याचे आवाहन संत, पंथांच्या परंपरेने केले, आणि महाराष्ट्राने संघटितपणे स्वीकारून स्वत्व सिद्ध करून दाखविले. विरोधकांनी अनुसूचित जाती जमातींना संविधान बदलाची भीती दाखविली होती. पण भारतरत्न आंबेडकरांचे संविधान संपूर्ण देशात लागू केले, व जम्मू काश्मीरमध्ये पंचाहत्तर वर्षांनतर संविधान लागू करून आरक्षण देणारे मोदी हेच एकमेव नेता आहेत, हे जनतेच्या लक्षात आल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. आजचा हा सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.

आम्ही एक होतो, म्हणून सेफ होतो, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, श्री. आठवले व सोबतच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे लढलेल्या या लढाईने दाखवून दिले आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे प्रोत्साहन, अमितभाई शाह यांनी कार्यकर्त्यांना दिलेली उर्जा आणि, प्रेरणा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अशा अनेक नेत्यांनी राज्यात बळ दिले. संपूर्ण केंद्रीय नेतृत्व ताकदीने उभे राहिले. श्री. बावनकुळे आणि संपूर्ण कोअर कमिटी भक्कमपणे कायम कार्यरत होती. पक्षाने संकुचित विचार न करता मित्रपक्षांसाठीही तेवढ्याच ताकदीने काम केले, म्हणून हा विजय मिळाला आहे, असे सांगून फडणवीस यांनी त्यांचेही आभार मानले, तेव्हा उपस्थितांनी जोरदार जयजयकार करून विजयोत्सव साजरा केला.

 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments