सातारा(अजित जगताप ) : देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला. या हल्ल्याला सोळा वर्षे पूर्ण झाली असून आज संपूर्ण देशभर शहीद वीरांना मानवंदना देत आहेत. यामध्ये शहीद झालेले आय.पी.एस. अधिकारी अशोक कामटे यांचे सारथी असलेले सेवानिवृत्त पोलीस वाहन चालक अशोक कामटे यांच्याशी संवाद साधला. आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
आयपीएस अधिकारी अशोक कामटे हे शहीद झाल्यामुळे जगभर ओळखले जातात. परंतु, १९९३ साली सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक कामटे व सातारा पोलीस दलातील अशोक दत्तात्रय कामटे हे मूळचे चांभळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळचे रहिवाशी आहेत. १९७१ साली सांगली जिल्ह्यातील मोटार परिवहन विभागात भरती झालेले वाहन चालक अशोक कामटे यांनी सांगलीमध्ये सेवा केल्यानंतर १९७९ साली ते सातारा पोलीस मुख्यालयात आले. त्यावेळेला पोलीस अधीक्षक जयंत उमराणीकर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर विभाग मध्ये ते कार्यरत होते.
कराड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असतानाच त्यांच्या किरकोळ अपघात झाला. त्यावेळी ते वैद्यकीय अहवाल देण्यासाठी कराड पोलीस ठाण्यात आले होते .त्याचवेळी कराडच्या जातीय दंगल शमवण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक अशोक कामटे हे रस्त्यावर उतरले होते. काही काळानंतर ते पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमोरून कुबड्या घेऊन वाहन चालक अशोक कामटे निघाले होते .त्यांनी पोलीस ठाण्यातील सहकार्यांना सांगितले की, इस आदमी को यहा बुलाओ . त्यावेळी अशोक कामटे त्यांच्यासमोर उभे राहिले. आणि पोलीस अधीक्षक अशोक कामटे यांनी त्यांना नाव विचारले. तेव्हा, त्यांनी सांगितले माझं नाव अशोक दत्तात्रय कामटे आहे. हे नाव ऐकताच अशोक कामटे सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी गाव विचारला असता चांभळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे गाव असल्याचे सांगितले. या वेळेला गाववाला भेटण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. त्यांनी अधिक माहिती विचारून तात्कालीन गुन्हा अन्वेषण विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक दयानंद यादव यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पायाला काय झाले? याची विचारपूस केली.
त्यानंतर सातारा येथे वाहन चालक अशोक कामटे हे कामानिमित्त आले असता सातारा पोलीस अधीक्षक अशोक कामटे यांनी त्यांना राखीव पोलीस दलाचे निरीक्षक यांना सांगितले की , कराड एस पी अशोक कामटे को बुलाव. हे ऐकून बुरुंग यांना धक्का बसला. हिंदी मध्ये संवाद साधल्यानंतर अशोक कामटे यांनी त्यांना आपला सारथी म्हणून बोलावलं. यापूर्वी मापारी व गायकवाड हे पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांचे वाहन चालवत होते. त्यांच्या गैरहजेरी मध्ये अशोक कामटे हे त्यांचे सारथी झाले. अशोक कामटे हे खेळाडू वृत्तीची असल्यामुळे त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी पोलीस दलातील एक शिपाई नेहमी जात होते. परंतु त्यांनी गंभीर चूक केल्यामुळे निलंबित केले होते. ते बॅडमिंटन खेळण्याचा आले नाहीत म्हणून विचारणा केले असता त्यांना निलंबित केल्याचे समजले. त्यांनी पोलीस अधीक्षक कामटे साहेबांनी समज देऊन पुन्हा त्यांना सेवेत घेतले. असे मनाने प्रेमळ असणारे अशोक कामटे हे पोलीस कर्मचाऱ्यांची नेहमी काळजी घेत होती .
एवढेच नव्हे तर अशोक कामटे हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला रक्षक कॉलनी पुणे येथे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना घेऊन जाण्याची जबाबदारी त्यावेळी अशोक कामटे यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. आजही शहीद अशोक कामटे यांच्या बद्दल व त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. सध्या सेवानिवृत्त अशोक कामटे हे विघ्नहर्ता सोसायटी, कोंडवे, सातारा या ठिकाणी सेवानिवृत्तीचा काळ आनंदाने घालवत आहेत . सध्या त्यांचं वय ७३ आहे .शहीद वीर व अशोक कामटे यांना मानवंदना देण्यासाठी ते नेहमी हजर असतात.
शहीद अशोक कामटे बद्दल बोलतात साताऱ्यातील अशोक कामटे …
RELATED ARTICLES