प्रतिनिधी : संपूर्ण जगात शाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा पोहोचवला. लोककलेचा आणि समाज प्रबोधनाचा प्रयत्न शाहिरांनी त्यांच्या लोककलेतून केला. हाच वारसा त्यांचा मुलगा गायक नंदेश उमप हा ‘विठ्ठल उमप फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षं जपण्याचा प्रयत्न करतो आहे. शाहिरांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त यंदाही १४ वा ‘लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह’ आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार सोहळा’ २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात पार पडत आहे.
लोककला, सामाजिक क्षेत्र, अभिनय, नवोन्मेष प्रतिभा, लेखक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान मृगंध पुरस्कारानं करण्यात येतो. याविषयी फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप सांगतात की, ‘या पुरस्काराची व्याप्ती दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे यावर्षीपासून खेळाडू आणि पत्रकार यांचादेखील सोहळ्यात समावेश करण्यात आला आहे. यंदा जीवनगौरव पुरस्कार पुरुषोत्तम बेर्डे यांना देणार आहोत. शाहीर विठ्ठल उमप यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकात काम केलं होतं. त्यामुळे त्या दोघांचं विशेष नातं होतं. तसंच सामाजिक क्षेत्रात श्रीगौरी सावंत, क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षिका दीपाली देशपांडे, पत्रकार ज्ञानेश महाराव, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, गायक रोहित राऊत, सुरेखा पुणेकर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचा यावर्षी पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. येत्या काळात इतर राज्यांतील लोककलावंत, गायक, कलाकार मंडळींना निमंत्रित करणार आहे. शाहिरांना पाश्चिमात्य संगीताचीदेखील आवड होती, त्यामुळे भविष्यात पाश्चिमात्य गायक, कलाकारांनादेखील या पुरस्कारासाठी बोलावण्याचा मानस आहे’.
विठ्ठल उमप फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो. ‘यंदा पडद्यामागील गरजू कलाकारांना आर्थिक मदत करणार आहोत’, असे नंदेश उमप सांगत होते.