मुंबई : धारावीतील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी उभारले जाणारे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रच (आयटीआय) चोरीला गेल्याचा थेट आरोप शिवसेना उपनेते, माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार, 2014 मध्ये शासनाने मंजूर केलेले आयटीआय तत्कालीन मंत्री आणि स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांच्या कृपेने केवळ कागदावरच राहिले, असा टोला शेवाळे यांनी लगावला.आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शेवाळे यांनी हे वक्तव्य केले.

शेवाळे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रगतीचे ग्रोथ इंजिन म्हणून धारावीकडे पाहिले जाते. धारावी हे लघुउद्योगांचे केंद्र मानले जाते. या धारावीतील उद्योगधंद्यांची पार्श्वभूमी बघता इथल्या युवकांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या हेतूने येथे शासनाच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रासाठी शासनाने सुमारे 20 कोटींच्या निधीची तरतूदही केली होती. प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असणारे शिक्षक वर्ग आणि कर्मचारी याबाबतही शासन पातळीवर मान्यता देण्यात आली होती. यावेळी तक्तालीन मंत्री आणि स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड यांनी या आयटीआयच्या निर्मितीसाठी स्वतःची पाठ देखील थोपटून घेतली होती. या धारावीच्या आयटीआय मध्ये काही वर्षे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन देखील झालेले दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात 10 वर्षे उलटूनही हे आयटीआय अस्तित्वातच आलेले नाही. अनेक दशकांपासून धारावीकरांवर राज्य करणाऱ्या स्थानिक आमदारांनी हे आयटीआय सुरू करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले? असा सवाल धारावीकरांनी आता विचारायला हवा, असे आवाहन करत शेवाळे यांनी संबंधित विषयातील शासन निर्णय आणि कागदपत्रे समोर मांडली.
चौकट
धारावीकरांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये लाखो रुपयांची मेंबरशिप घेऊन बाहेरच्या लोकांना सुविधा पुरवल्या जात आहे. मात्र धारावीतील मुलांना या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये साधा प्रवेश देखील नाही, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे माजी खासदार शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.
कोट –
“मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धारावीमधील युवकांना औद्योगिक प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. या प्रशिक्षणातून इथल्या युवकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकतील. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरही तब्बल 10 वर्षे धारावीतील युवकांना हक्काचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होऊ शकले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. धारावीकरांच्या मतांवर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मनात धारावीकरांबद्दल खरंच किती कळकळ आहे, हे यातून स्पष्ट होतं. आज जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा होत असताना देशाच्या आर्थिक राजधानीतील युवकांवर झालेल्या या अन्यायाविरोधात नक्कीच पेटून उठेल याची मला खात्री आहे. धारावीतील युवक महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश खंदारे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील, याचा मला विश्वास आहे.”
- राहुल रमेश शेवाळे, शिवसेना उपनेते माजी खासदार