
कराड (अजित जगताप) : वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी वंचित आघाडीच्या पूर्वाश्रमीच्या पदाचा राजीनामा दिला व भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यानिमित्त केंद्रीय रासायनिक व खत निर्मिती राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते कराड येथे त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन गेली दहा वर्षे प्रामाणिकपणाने तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम श्री बाळकृष्ण देसाई यांनी केले होते. वंचित आघाडीचे कराड दक्षिण विधानसभेचे उमेदवार म्हणूनही त्यांनी स्वखर्चाने निवडणूक लढवून वंचितचा झेंडा खंबीरपणे हातात घेतला होता. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे त्यांनी वंचितचा राजीनामा दिला व सातारा जावळीचे विक्रमी मतांनी निवडून येणारे आमदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथे भाजप पक्षात प्रवेश केला.
सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीचा त्याग करून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. आज सार्वजनिकरित्या प्रथमच बाळकृष्ण देसाई हे भाजपच्या मलकापूर ता. कराड येथील भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारा निमित्त झालेल्या कार्यक्रमाला हजर झाले होते. त्यावेळेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपचे बाजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, तसेच ज्येष्ठ विचारवंत मदनराव मोहिते व धनाजी पाटील- आटकेकर आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती जमाती सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष अमित भिसे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी श्री देसाई यांचा सत्कार केला.
भविष्यामध्ये श्री देसाई यांना भाजपच्या वतीने मोठी जबाबदारी देऊन ओ.बी.सी. संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे केंद्रीय मंत्र्यांनी श्री देसाई यांचा सत्कार करून स्पष्ट केले आहे.