Wednesday, November 13, 2024
घरमहाराष्ट्रमित्राजीवी अदानी सरकारचा क्रूरपणा,एअर इंडिया कॉलनी खाली करण्यासाठी फक्त ४८ तासांची नोटीस...

मित्राजीवी अदानी सरकारचा क्रूरपणा,एअर इंडिया कॉलनी खाली करण्यासाठी फक्त ४८ तासांची नोटीस – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : अदानीसाठी काहीही करण्यास तत्पर असणाऱ्या भाजपा युती सरकारने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. एअर इंडिया कॉलनीत अनेक दशकांपासून रहात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी अत्यंत अमानुष वागणूक दिली जात आहे. शासन व प्रशासनाने अदानींच्या लोकांना घरे खाली करण्यासाठी काहीही करु देण्याची सुट दिलेली असून फक्त ४८ तासात घर खाली करण्याची नोटीस देण्याचा संतापजनक प्रकार केला आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एअर इंडिया कॉलनीतील ज्या लोकांना घराबाहेर काढले त्यांच्याबरोबर काल रात्री रस्त्यांवर थांबून त्यांच्याकडून माहिती घेतली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे महायुती सरकारने पोलीस आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अदानीच्या माणसांना हवे ते करू द्यावे आणि नागरिकांना मदत करू नये असे सांगितले आहे. लहान मुलांसह अनेकजण घरात आत असतानाही त्याची दखल न घेता अधिकाऱ्यांनी घरे सील केली आहेत. एअर इंडिया कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून हाच प्रकार सुरु आहे. घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक रहात आहेत, अनेकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांची पर्वा न करता घरे खाली केली जात आहेत, त्या सर्वांनी कुठे जायचे हा प्रश्न आहे.

मित्राला खूश ठेवण्यासाठी अदानी सरकारचे हे अपमान जनक आणि संतापजनक वर्तन आहे. हे फक्त एअर इंडिया कॉलनी किंवा धारावीपुरते मर्यादित नाही हे मुंबईकरांनी लक्षात घेतले पाहिजे. हे मुंबई शहराबद्दल आणि आपल्या सर्वांच्या घरांबद्दल आहे, यापुढे अशाच अमानुषपद्धतीने घरे खाली केली जातील. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर हे असे घडत असेल तर उद्या ते आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत होऊ शकते म्हणून या हुकूमशाही विरोधात एकत्र येण्याची गरज आहे असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments