मुंबई : धारावी मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. लोकनेते एकनाथ गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक डॉ. ज्योती गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेस उमेदवाराला मिळणारा पाठिंबा पाहून भाजपा युतीच्या पायखालची वाळू सरकली असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मतदरांना भेट वस्तूंचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माहिती देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस व गायकवाड कुटुंब नेहमीच धारावीकरांच्या सोबत आहे, धारावीच्या लोकांसाठी संघर्ष करत आहे. धावारी व काँग्रेस यांचे हे नाते घट्ट आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांचा विजय निश्चित आहे, त्यामुळे विरोधकांकडून मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांच्याकडून मतदारांना भेट वस्तूंचे वाटप केले जात आहे. शक्रवारी रात्रीही असाच प्रकार उघडीस आला असून उमेदवार राजेश खंदारे यांचे भाऊ प्रदिप खंदारे यांच्या मालकीच्या हॉलमध्ये वार्ड क्रमांक १८६ च्या शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुख सुनिता कैलास सोनटक्के यांच्या उपस्थितीत महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबतची रितसर तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून शिवसेना उमेदवार राजेश खंदारे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
