मुंबई(रमेश औताडे) : सर्व कायदे नियम मोडीत काढून मनमानी कारभार करत, घटना तोडून टाकत वागणाऱ्या, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या सत्तेत अदाणी पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटायला नको. असे मत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) नेते अनिल परब यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित ” विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका ” उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेच्या पहिल्या भागात अनिल परब बोलत होते.
शिवसेना व महाविकास आघाडी ची भूमिका सांगत असताना परब म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार.
लाडकी बहिण योजनेला विरोध नाही मात्र निवडणुका जवळ आल्याने केलेले हे नाटक जनता विसरणार नाही.
कोणत्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर आज कोणीही काहीही बोलत आहे. त्यासाठी एका संहितेची गरज आहे.
जी एस टी बाबत जो गोंधळ सुरू आहे त्यात गरीब व्यापारी भरडला जात आहे. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.
३७० कलम हटवले गेले मात्र काश्मीरी जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यासाठी एका डिबेट ची गरज आहे.
वक्फ बोर्ड बाबत संयुक्त संसदीय समितीच्या अहवाल आल्यावर शिवसेना भूमिका घेणार आहेच मात्र हिंदू देवस्थान जमिनी कुणाच्या खिश्यात गेल्या हे लवकरच बाहेर येणार आहे.
महाविकास आघाडी च्या गाडीला ड्रायव्हर नाही, ब्रेक नाही असे बोलणाऱ्यांच्या गाडीचा लोकसभेत अपघात झाला त्या अपघाताच्या इन्शुरन्स साठी आता ते सावध पावले टाकत खोटी आश्वासने देत आहेत.
कोकणातील विनाशकारी प्रकल्प गुजरातला घेऊन का जात नाहीत ? कोकणाचा विकास नाहीतर कोकण भकास करणारे प्रकल्पच कोकणात का आणले जात आहेत ? असा सवाल परब यांनी केला.
आमच्या घरात चोरी नाही डाका पडला आहे. उध्दव ठाकरे आता घर सावरायला लागलेत थोडा वेळ लागेल. चोर आणि पोलीस एकत्र आल्यावर न्याय मिळवणं थोडे कठीण जात आहे. मात्र जनतेने यांचे सर्व खेळ ओळखले आहेत.
पोलिसांच्या वाहनातून पैसे चेक नाक्यावरून पास होत आहेत. सर्व यंत्रणा गप्प आहे. आमचे काही जवळचे पोलीस आहेत त्यांनी आहाला सर्व माहिती दिली आहे.
गिरणी कामगारांना न्याय देणारी एकमेव शिवसेना आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.असा विश्वास परब यांनी यावेळी दिला.
शिवसेना पक्ष व चिन्ह हे उध्दव ठाकरे यांचेच आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्हील बनविण्यात मी होतो. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते जे जे माझे आहे ते उध्दव ठाकरे यांना मिळाले पाहिजे असे त्यात नमूद आहे.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, कार्यवाह शैलेंद्र शिर्के,
माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी,ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.