Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआयुष्याचे शतक व मतदानाच्या अर्धशतकासाठी पै.साहेबराव पवार सज्ज…

आयुष्याचे शतक व मतदानाच्या अर्धशतकासाठी पै.साहेबराव पवार सज्ज…


सातारा (अजित जगताप) : लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीने अनमोल दिलेला अधिकार म्हणजे मतदान होय. आज प्रत्येक नागरिकांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदान करावे. यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय स्तरावर जनजागृती केली जाते. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व शासकीय सेवेतील मतदार अशा विविध मतदारांसाठी सुविधा निर्माण केलेले आहेत. तरीही आयुष्याचे शतक पूर्ण करून अर्धशतक मतदानासाठी जावळीचे सुपुत्र पै .साहेबराव आबाजी पवार तथा भाऊ सज्ज झालेले आहेत. त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येऊ लागलेली आहे.
आदरणीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांनी १५ सप्टेंबर रोजी नुकतेच आयुष्याचे शतक साजरे केले. आजही डोळ्याला चष्मा नाही. ऐकण्यासाठी कानामध्ये यंत्र नाही. एवढेच नव्हे तर चालण्यासाठी हातात काठी सुद्धा नाही. असे शारीरिक वैभव लाभलेले साहेबराव भाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वच वयोगटातील लोकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वतः मतदान केंद्रात जाऊन मतदान करणार आहेत. या त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद नक्कीच घेतली जाणार आहे.
१९५१ पासून ते आज पर्यंत त्यांनी कोणतेही मतदान चुकावलेले नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करताना कराड व सातारा लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, नगरपालिका अशा प्रत्येक ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
जावळी तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असलेल्या पैलवान साहेबराव पवार भाऊ यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी अनेक सहकारी पैलवानांच्या सोबत तालीम संघाची उभारणी केली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष एवढेच नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जावळीचे माजी सभापती, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष, सत्यशोधक विचारांचे पाईक ,क्रीडा संघटक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा अनेक चौफेर ठिकाणी आपले कर्तव्य दाखवून दिलेले आहे.
मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून त्यांनी मतदान केले असून मतदानाचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. मतदान केंद्रात जाऊन ते मतदान करणार आहेत. त्यांच्या या जिद्दीबद्दल सातारा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने ही नोंद घेतलेली आहे. खरं म्हणजे मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर आबा अशा अनेक नेत्यांच्या सहवासामुळे त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. अनेक पद भूषवले आहेत. निवडणुका ही लढवल्या. जय- पराजय जवळून पाहिले. परंतु मतदार म्हणून त्यांनी जी नैतिक जबाबदारी पार पाडलेली आहे. ती कधीही विसरता येणार नाही. दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सातारा विधानसभा मतदार संघासाठी ते सातारा जावली मतदारसंघात मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करून एक इतिहास घडवतील.या बद्दल कोणाचे मनात शंका नाही. पूर्वी शिक्के मारले जात होते. आता मतदान यंत्रणेतून बटन दाबले जात आहे. असा दोन्ही कालखंड त्यांनी अनुभवला आहे. अठराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते मतदान करून इतरांनीही मतदान करावे असे आवाहन करत आहेत. त्यांना त्यांची पत्नी सौ सोनुबाई साहेबराव पवार व मुले- मुलगी, पुतणे ,सुना, जावई, नातवंड व हितचिंतक यांची मोलाची साथ लाभत आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments