प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या शिलेदाराला काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर झाला आहे. पण त्यानंतरही पडद्यामागे हालचाली घडत आहेत. ठाकरे गटाचा मुंबईतल्या एका जागेवर दावा आहे. यासाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचं आवाहन केले आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोसाळकर यांना दिला आहे. मात्र आपण शिवसेनेकडूनच निवडणूक लढू, असे स्पष्ट मत घोसाळकर यांनी व्यक्त केले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, असा आग्रह उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आणि त्यासाठीच नेत्यांच्या भेटीगाठी पदाधिकाऱ्यांकडून घेतल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाकडे या लोकसभा मतदारसंघात उमेदवारच नसल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाला लढू द्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
शिवसेनेला उत्तर मुंबईची जागा मिळावी म्हणून उत्तर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः विनोद घोसाळकर उपस्थित होते. तर दुसरीकडे उत्तर मुंबईतल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.