सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पूर्वी उसाला कोल्हा लागत होता. आता मात्र ऊसाला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण लागत आहे . यातून गरीब , कष्टकरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागलेले आहे. यापूर्वी अपघाताने व काही शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस पेटवला होता पण त्यावेळी निवडणुका नसल्यामुळे कुणी लक्ष दिले नाही आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्याने आगळवेगळे राजकारण दिसू लागलेले आहे.
याबाबत माहिती अशी की सातारा तालुक्यातील पाटखळ गावातील काजू मळा नावाच्या शिवारात स्थानिक शेतकऱ्यांनी दोन एकरची उसाची लागण केली होती. अज्ञात व्यक्तींनी राजकारणाच्या पायी हा ऊस पेटवला. त्यामुळे या प्रकरणाच्या छडा लावण्यासाठी सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे यांनी धाव घेतली. या वेळेला पाटखळ गावचे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंतर्गत रस्त्यातही प्रश्न मांडण्यात आला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पाठखळ गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या शेतातील ऊस पेटवण्यात आला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. असा एका गटाने आरोप केला आहे.
याबाबत आमदार महेश शिंदे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस मुख्यालयात जाऊन ग्रामस्थांच्या सोबत भेट घेतली .आपल्या गटातील कार्यकर्त्यांवरील आरोपाचे खंडन केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वांची नार्को टेस्ट घ्या. त्यांच्या मोबाईलची लोकेशन पहा. स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागामार्फतच या प्रकरणाची चौकशी करा.अशी त्यांनी मागणी करून याबाबत ज्या एजन्सीने गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांचीही चौकशी करावी. असे त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांना सांगितले. अन्यथा याबाबत संबंधितांवर कायदेशीर रित्या अब्रू नुकसानचा दावा दाखल करू. असे त्यांनी स्पष्ट केले.
