सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र विधानसभेच्या सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये आजच मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. पूर्वी कार्यकर्त्यांच्या हाती निवडणुकीचे तंत्र होते. आता काही दलाल व ठेकेदारांच्या हाती नियोजन गेल्यामुळे सर्वत्र गर्दीचा महापूर दिसत आहे. या गर्दीमुळे वाढती बेरोजगारी लक्षणीय दिसू लागली आहे. याबाबत गेली आठ ते दहा निवडणूकीत मतदान करणारे जानकर व ज्यांनी निवडणुकीच्या काळात उन्हाळे- पावसाळे-हिवाळे बघितले आहेत .अशा मंडळींनी तात्कालीन लोकप्रतिनिधी बाबुराव घोरपडे, प्रतापराव भोसले, दत्ताजीराव बर्गे, अभयसिंहराजे भोसले, केशवराव अण्णा पाटील, चिमणराव कदम, शंकरराव जगताप, पी डी पाटील, यशवंत मोहिते, कृष्णाराव तरडे, विष्णुपंत सोनवणे ,बाबासाहेब आखाडकर, बाळासाहेब देसाई, विक्रमसिंह पाटणकर अशा रथी महारथी निष्ठावंत लोकप्रतिनिधींच्या निवडणूक प्रचाराची अनेक किस्से सांगितले.
सातारा जिल्ह्यात पूर्वीच्या काळी पोते भर चिरमुरे आणि त्यामध्ये चार किलो चिवडा एकत्रित करून दैनिकाच्या पेपरच्या तुकड्यावर ते खाद्य प्रचारात आलेल्या कार्यकर्त्यांना वाटत होते. आपल्याला खाद्य मिळाले याचे समाधान अनेकांना खूप काही शिकवून जात होते. त्याकाळी नेत्यांची दूरदृष्टी होती. पण, आता धन दांडग्यांच्या हाती सत्ता गेल्यामुळे ते बेधुंद झालेले आहेत. आता आधुनिक राजकीय सरदारांचे हाती ठेकेदारी आल्याने त्या पैशातून कार्यकर्त्यांना लाचार बनवण्याचे यंत्र तयार केलेले आहे. या यंत्रातून कोणी सुटू शकत नाही.
पूर्वीच्या काळी कुटुंबाला सार्वजनिक जीवनामध्ये स्थान नव्हते. एकच नेता हा सामाजिक जीवनामध्ये लोकांची कामे करत होता. कुटुंबातील सदस्यांनी फक्त घरी आलेल्या कार्यकर्त्याला चहा पाणी देणे. एवढे मर्यादित त्यांचे काम होते. आताच्या घडीला””””””””” कुटुंब रंगले प्रचारात…. अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक नंबरचा गावातील लबाड कार्यकर्त्या असतो. त्याच्याच हाती सर्व कारभार देण्यात आल्यामुळे अनेकांच्या तोंडी पैशाचे अफरातफर झाल्याचेच निवडणूक झाल्यानंतर बाहेर येत आहे. पैशाची निगडित सर्व कारभार होत असल्यामुळे गद्दारांची टोळी गावोगावात निष्ठावंतांवर वरचढ होऊ लागलेली आहे. जर नेताच निष्ठा ठेवत नसेल तर कार्यकर्त्यांकडून कशी काय अपेक्षा करावी ? असाही मार्मिक प्रश्न जुने जाणते सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रशांत करडे ,मच्छिंद्र जाधव, अजित निकम, के. एस. कांबळे, संजय जाधव, प्रल्हाद पवार, जमीर मुलाणी यांनी सांगितले.
पूर्वी राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यावर समाजाची मनापासून निष्ठा होती. याबाबत उदाहरण देताना एका कार्यकर्त्यांनी सांगितले की ४० वर्षांपूर्वी मालगाव मध्ये एक दरोडा पडला. आणि त्या दरोडाच्या तपासासाठी फौजदार सातारा तालुक्यातील गोवे गावात आले होते .त्यांनी एका मागासवर्गीय समाजातील एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यासाठी निघाले असताना अचानक एका काँग्रेस नेत्याची भेट झाली. त्यांनी विचारले काय आज एवढ्या गडबडीत फौजदार साहेब इकडे कुठे? त्यावेळी फौजदारांनी सांगितले की, मालगाव येथे दरोडा पडला असून पुढील तपासासाठी संशयित म्हणून यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यावेळी त्या काँग्रेस विचार धरणीच्या नेत्याने छाती ताठ करून सांगितलं की, फौजदार साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. ती व्यक्ती असं काही करणार नाही. क्षणाचाही विलंब न लावता फौजदार साहेबांनीही ताबडतोब त्या व्यक्तीला सोडून दिले. कारण, नेत्यांची समाजात नैतिकता होती. त्यांच्या शब्दावर विश्वास होता. आज प्रत्येक नेता विरोध करणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला अडचणीत आणण्यासाठी पोलीस ठाण्याचा वापर करतो. याच्यासाठी ७ बाय २४ पाठपुरावा व परिश्रम घेत असतो. आता विधानसभेच्या अर्ज दाखल करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात जी काय शक्ती प्रदर्शन होत आहे. त्या शक्ती प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांचे नाहक हाल होत आहेत. आणि ज्यांना त्याचा त्रास होत आहे .अशी मंडळी आपापल्या घरात कडी लावून बसलेले असतात. फक्त ते समाज माध्यमातून व्यक्त होतात. त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र दिसू लागलेली आहे. सध्या सर्वत्र निकृष्ट दर्जाचे काम करून व टक्केवारी देऊन विकासाचा मृगजळ उभा केला जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या निवडणुकीवर विश्वास राहिलेला नाही. निवडणुकीमध्ये मतदान करणे. हा सर्वांचा अधिकार आहे. परंतु, कुणासाठी मतदान करावे ? असा उलट प्रश्न मतदार विचारू लागलेले आहेत. जर ठेकेदारच निवडणुकी प्रक्रिया हातात घेत असतील तर यापेक्षा जास्त शक्ती प्रदर्शन झाले तरीसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी अखेर जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागते. हे मात्र नाकारून चालणार नाही. यात बदल करण्यासाठी निवडणुकीतील ठेकेदारांचा सहभाग कमी करण्यासाठी आता कोणालाही शक्य होणार नाही. अशी ही कुजबूज खेड्यापाड्यात सुरू झालेली आहे. दरम्यान, ठेकेदारांनीच ही निवडणूक हाती घेतल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता राहिली नसल्याचेही जुने जाणत्या कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सत्याला सत्य म्हणण्याचे धारिष्ट राहिले नसल्याने गावोगावी आता प्रचारानिमित्त टोळ्या फिरू लागल्या आहेत. अशा बिदागी बहादूरांना निवडणूक म्हणजे सुगीचे दिवस वाटू लागलेले आहेत.
