सातारा(अजित जगताप) : राजकारणामध्ये नेहमीच अग्रेसिव्ह असलेल्या मातंग व बौद्ध समाजातील अनेक तरुण कार्यकर्ते सर्वच राजकीय पक्षात विखुरलेले आहेत. पण ,त्यांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक राजकीय पक्षाकडून संधी मिळत नाही. सातारा जिल्ह्यातील फलटण या राखीव मतदारसंघात मातंग व बौद्ध मतदारांची संख्या लक्षणीय असून सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील उर्वरित आठ मतदारसंघात मातंग व बौद्ध समाजातील मतदारांची आता खरी कसोटी पाहण्यास मिळणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर १९६० साली २६४ मतदारसंघांमध्ये ३३ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी व १४ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यानंतर२०१८ च्या मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर अनुसूचित जातीची मतदारांची संख्या २९ तर अनुसूचित जमातीची संख्या२५ पर्यंत पोहचली. उर्वरित मतदार संघामध्ये प्रस्थापित घराणे व राजकारणातील मुरंबी मंडळींनीच आतापर्यंत खासदार -आमदार होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्वच आरक्षित जागेमध्ये त्यांनी दिलेला उमेदवार सुद्धा निवडून देण्यासाठी मतदार जागृतीने काम करत आहेत. सध्या समाज माध्यमावर व राजकारणामध्ये अनेक उलथा पालथ झालेली आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये मराठा व धनगर आरक्षण याचबरोबर कुणबी मराठा समाजाचा इतर मागासवर्गीय मध्ये समावेश करण्याची मागणी अशा अनेक जातीय प्रश्नांमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले आहे. याची सर्वत्र चर्चा होत असतानाच सातारा जिल्ह्यातील राखीव फलटण मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडीने जाणीवपूर्वक मातंग व बौद्ध समाजाला डावलून अनुसूचित जातीतील उर्वरित ५६ जातीमधीलच उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. मात्र ही उमेदवारी देताना त्यांच्या त्या समाजातील योगदान पाहिलेलं नाही. ज्यांना उमेदवारी दिली. त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळालेच नाही. त्याचे आता पुन्हा नूतनीकरण करण्यासारखाच प्रकार फलटणमध्ये पाहण्यास मिळालेला आहे. याला छेद देण्यासाठी आता मातंग व बौद्ध समाजाने सुद्धा सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी विरोधात सुप्त का होईना. पण, रान पेटवण्यास सुरुवात केलेली आहे. लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करताना भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मातंग व बौद्ध समाजाला डावलण्याचे धारिष्ट सुद्धा राजकीय पक्ष करतील. याबद्दल आता कुणाचे मनात शंका उरलेले नाही. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा असेल तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय या दोन्ही जातीने शोधून उमेदवार दिल्यास खऱ्या अर्थाने विधानसभा मतदारसंघात मातंग व बौद्ध समाजाची ताकद निश्चितच भविष्यात या दोन समाजातील प्रतिनिधित्वासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या दोन समुहातील कार्यकर्ते वाड्या- वस्तीत प्रचारासाठी आल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी तरुण पिढी सज्ज झालेले आहेत. आमचा जन्म हा फक्त मतदानासाठी नाही तर जाब विचारण्यासाठी सुद्धा आहे हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीने आक्रमक भूमिका मातंग व बौद्ध समाजातील तरुण घेत आहेत .हे स्वागतार्ह बाब आहे. मातंग किंवा बौद्ध समाजातील विद्वान व अभ्यासू असलेले व स्वावलंबी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला तिसरा पर्याय म्हणून उमेदवारी उभे केल्यास प्रस्थापित घराण्याला निश्चितच शह मिळणार आहे. त्यासाठी अनुसूचित जातीमधील वर्गीकरणाचा भाग फायदा की तोटा? याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. तूर्त सध्या मातंग-बौद्ध समाजाला राखीव माण मतदार संघात यापूर्वी संधी मिळालेली आहे. परंतु, फलटण मतदारसंघात मातंग व बौद्ध समाजाला आता उठाव करूनच हक्क मिळवावे लागतील. यासाठी आता या दोन्ही घटकातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण या राखीव मतदार संघामध्ये या दोन्ही जातींच्या सोबत अनेकांचे चांगले संबंध असून राजकारणामध्ये या दोन जातीने जर ठरवलं तर सातारा जिल्ह्यातील उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णय मतदान या दोन जातीने करावे. आणि त्याचा जो निकाल लागेल तो भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला या दोन जातीचा विचार केल्याशिवाय इतरांना संधी मिळणार नाही. हा संदेश पाठवायचा असेल तर आतापासूनच त्याची पेरणी करावी लागेल. असे प्रांजळपणाने मातंग बौद्ध समाजातील तरुण कार्यकर्ते मत व्यक्त करू लागलेले आहेत. दरम्यान, मातंग व बौद्ध समाजाच्या एकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध असून भविष्यात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी भावना मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते अमोल आवळे, सुरेश बोतालजी , सत्यवान कमाने, बौद्ध समाजातील प्राध्यापक अरुण गाडे, अमोल गंगावणे, दिलीप जगताप यांच्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ……………………….
सातारा जिल्ह्यात मातंग- बौद्ध मतदारांची खरी कसोटी?
RELATED ARTICLES