ठाणे:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, यांनी 147 कोपरी - पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्ष तसेच नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच ज्याठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या सेंटरलाही भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी नामनिर्देशन अर्जांबाबतचा आढावा देखील यावेळी घेतला व एकूणच त्यांनी सर्व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक जाधव, 147 कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंढे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
