Friday, September 12, 2025
घरमहाराष्ट्रमम्मी, तुझी आठवण प्रेमाची साठवण !"-डॉ. उज्वला जाधव, मुंबई.

मम्मी, तुझी आठवण प्रेमाची साठवण !”-डॉ. उज्वला जाधव, मुंबई.

मुंबई : जन्मा आधी 9 महिने वास्तव्यास होते तुझ्या पोटात मी. आता 9 महीने या जगात, या संसारात तुझ्या विनाच राहतोय आम्ही. आज कोजागिरी पौर्णिमा, आणि 16 तारीख जी तू आमच्या पासून दूर जाण्याची हीच ती तारीख. सकाळी आठवण झाली. कोजागिरी पौर्णिमेचा स्वतःचा फोटो टाकून व्हाट्स ॲप स्टेटस टाकून ट्विट करून झाले, फेसबुक वरचा पण मेसेज पोस्ट झाला आजचा सकाळचा . पण मी दर महिन्याला आठवते ती 16 ह्या तारखेची असणारी जानेवारी महिन्याची ती शांत शांत रात्र. आज पुन्हा प्रकर्षाने पुन्हा आठवली नाही तर ती गडद झाली .
औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजी नगर) मम्मी तुझे वय 82. नुकताच तुझा वाढदिवस 1 जानेवारी ला केक कापून केलेला. हिरव्या रंगाचे गोल गळ्याचे टी शर्ट घालून तुझ्या सोबत फोटो काढलेला. तुझ्यासाठी मी केक आणलेला. तू तो काप पण तू पुन्हा नाही असे दर्शवून खाली पुन्हा अंग टाकलेस. तू मूड मध्ये नाहीस. आणि केक कापत नाहीस असे मानेनेच नाही म्हटलीस. मी तर बाजूला झाले पण तेंव्हा तुझा हात धरुन तुला बळजबरीने पिंकी ने तो कापायला लावला. हे आठवतेय. तुझ्या आजाराने तुझ्या शेवटच्या काळात तुझा सहवास मिळावा सेवा करावी म्हणून रात्रंदिवस सोबत राहणारी मी इतके दिवस इथे राहते याचे आश्चर्य घरातील आणि बाहेरच्यांना होते. त्या 16 तारखेच्या रात्री पण मी तुझ्या जवळ होते आणि आसपास आशा, बेबी, पिंकी आम्ही सर्व जणी मिळून चार बहिणी आणि तुझी छोटी लाडकी बहीण कमल, तुझी डॉक्टर सुन अंतेश्वरी असे तुला पाहत होतो. जवळपास सर्वांचीच खात्री झालेली की तुला देवा घरचे बोलावणे येते आहे. पण माझा काही केल्या विश्वासच बसत नव्हता हे सत्य स्वीकारायला. पण नंतर मला आशा म्हणतेय, माई मम्मी जातेय आपण लगेच तिला खाली घेऊन येऊ या. सर्वांनाच कळाले होते. बेबी मोठ्याने हंबरडा फोडत होती, पिंकी पुढे आली, तिने मोठ्याने टाहो फोडायला सुरुवात केली, कमल आंटी ती मिठ्या मारू लागली. आशाची लगबग सुरु मंत्र जाप चालू, सर्वांनाच कळत होते. सर्व दिसत होते. तू तर सर्वांनाच पुन्हा पुनः न्याहाळत होतीस. मधेच डोळे मिटत उधडत होतीस. त्या डोळ्यांच्या हालचाली पण मंदावत होत्या. बोलत नव्हतीस. पण त्या वेळेस तुझे डोळे आम्हा सर्वांनाच आलटून पालटून न्याहाळतांना तुला पलंगावरून खाली जमिनीवर ठेवण्याचा निर्णय झाला. आणि आम्ही तुला खाली तुझ्या सुंदर कार्पेटला सरकावून एक गादी घालून बिछाना तयार केलेला. त्यावर बेडशीट घालून तुला आवडणाऱ्या तुझ्या लाल रंगाचे हार्ट डिझाईन चे मानेचे कुशन तुझ्या उशाला ठेऊन तुला झोपवले आणि लाल रंगाचे तुझे आवडते ब्लॅंकेट टाकले. तुझ्या तोंडात गंगाजल टाकायचे होते, आशाने आणून ठेवली ती तांब्याची छोटी वाटी ताबडतोब उघडली आणि एकेक जणी असे आम्ही पटापट छोट्या चमच्याने त्यातून ते गंगाजल थेंब थेंब असे तुझ्या मुखात टाकत होतो. तू ते गिळत होतीस, डोळे मिटून पुन्हा उघडून पाहत होतीस. सर्वांनी तोंडात पाणी टाकून झाले. तुझ्या चेहऱ्यावर शांतता होती. पण तुझे डोळे शोध घेत होते. आम्ही प्रार्थनेची कॅसेट लावून ठेवलेली होतीच. मग आशाला काय कळले कुणास ठाऊक भाऊ भाऊ म्हणून सौमित्रला ओरडून बोलावून तिच्या तोंडात पाणी टाकायला लावले. बघ तुझ्याकडे पाहतेय ती तुझ्यात जीव अडकलाय तिचा आणि म्हणाली त्याला की वचन दे तिला तु नीट राहशील, सर्व बहिणींना बघशील. त्या प्रमाणे तो म्हणत गेला त्याने वचन दिले त्याचे वचन तू ऐकलेस आणि त्या नंतर लगेच 4-5 मिनिटात रात्रीचे 11.20 झालेले असतील तू तुझे अडकून ठेवलेले प्राण त्यागलेस. गेले ते तुझे प्राण तुला सोडून तुझ्या आणि आम्हाला प्रिय कायेतुन तुझ्या शरीरातून…. मम्मी गेली सोडून आमच्या सर्वांच्या आक्रोशा चा एकच गलका झालेला… माझा आवाज जास्त नाही बाहेर आला. पण मी सुन्न झाले डोळ्यांतून फक्त अश्रू ओघळत होते. माझे बी.पी. लो झाले होते. पण मी नशीबवान तुला आमच्यातून जाताना डोळेभरून पाहिले. तुला जिवंत असतांना पाणी गंगाजल पाजले. तुझ्या मनाप्रमाणे तुझे लाड करू शकले. आता कितीही अन्न पाणी दूध कुठे तुझ्या साठी ठेवले तर तु येशील का? कदाचित येशील एखाद्या रूपाने आणि भेटून जाशील. पण तुझ्या अस्तित्वाचे सातत्य तुझे प्रेमाची माई म्हणून दिलेली हाक नाही येत. मला या तारखेचा दोन चारदा प्रत्यय आलाय, म्हणूनच की काय सकाळी याच दिवशी बरोबर 8.30 ते 9.15 याच वेळेत कावळा येतो कवकाव करतो. स्वयंपाकवाली बाई म्हणते बघा आला तुमचा कावळा. मी त्याला बोल बोल काय म्हणतोस असे बोलत बोलत राहते असे हे मिनिट दोन मिनिट आमचे काही तरी संभाषण चाललेले
असतांना माझी वेडी भावना जागवून मी आवर्जून उठून एक दोन बिस्किटे, दुधात कॉर्नफ्लेक्स वगैरे तयार असतील तर पोहे किंवा नाश्त्याचा काहीही पदार्थ आणून प्लेट मध्ये ठेवते. त्याला वाटले तर तो खातो नाही तर त्या पदार्थाला आवर्जून टोच तरी मारून जातो. कुठे कावळा कुठे आई पण तुझी ही वेडी उज्ज्वल आणि वेडी माई. ताई मोठी तर माई लहान तू नावाबरोबर आम्हाला असेच बोलवायचीस.
पण आज बघते तो काय तर चक्क त्याच माझ्या नेहमीच्या दक्षिणेच्या खिडकीतून उडत उडत काल राखाडी छटा असलेले रंगांचे” फुलपाखरू ” चक्क हॉल च्या आत प्रवेश करते झाले. मला खुप छान वाटले. फुलपाखरू आत घरात आले. मी चहाच्या घोटाबरोबर तो क्षण टिपत होते आणि मोबाईल उचलून त्या भिंतीवर स्थिरावलेल्या फुलपाखराचा फोटो घेणार होते. तोच काम करताना बाई अचानक समोर आली. म्हणते मॅडम हे बघा कसे फुलपाखरू आत आलेय भिंतीवर. मी त्या फुलपाखरालाच बघतेय हे तिला माहित नव्हते आणि ती त्याला बाहेर काढण्यासाठी हुसकायला लागली. मी म्हणतेय अगं अगगं मानसी राहूदे त्याला फुलपाखरू आहे ते किती छान असते घरात आले तर मी पाहतेय त्याला ते काय करते कशाला उठवतेय पण ते आधीच तिच्या कापडाने हुसकावण्याच्या आवाजाने असुरक्षित झाले की काय नंतर अर्ध्या मिनिटात आले त्याच खिडकीतून परत गेले. मला फोटोत त्याला टिपता आले नाही. माहित नाही पण काल दिवस असाच गेला खुप अस्वस्थतेत. जरा डोके जड पडलेले. रात्री नीट झोप नाही आली. पावणे चार वाजे पर्यंत म्हणून त्याचा ताण तणाव असावा सर्व काही माझ्या पॉलिटिकल करिअरचाच तो असावा. पण उठून आंघोळ करून तयार होऊन बसावेसे वाटले नाही तशीच पेपर वाचत टीव्ही न्यूज पाहात दुपार पर्यंत बसून होते. कितीतरी वेळ अस्वस्थ होते. आज कावळा आला नाही. चक्क काळे राखाडी किनार असलेले ते फुलपाखरू आले होते घरात. तशीच दुपारी थोडे खाऊन औषध घेऊन चक्क झोपले. दोन अडीच तास. नंतर उठून संध्याकाळची आवरा आवर करायची ती केली. आंघोळ करून दिवाबत्ती करायची हा नित्यक्रम केला. ताजे दूध फ्रीझ मधून काढून तापवायला ठेवले. दुधात साखर, केशर, वेलदोडे , काजू , बदाम, पिस्ता टाकले आणि उकळायला ठेवले. चारोळ्या शोधल्या तर सापडल्याच नाही किचन मध्ये कुठे ठेवलेल्या असतील माहिती नसते. कुठे काय सामान ठेवलेय ते. आज नेहमी प्रमाणे पौर्णिमेच्या चांदोमामा साठी पोहे आणि दूध दाखवुन ते ठेवायला गेले. ते दाखवतांना सुंदर शीतल चंद्राला नमस्कार केला आणि दिवसभराची अस्वस्थता प्रकट झाली. मनात आले की अशा चंद्राच्या कुशीत राहण्यासाठी तर तिथे माझी आई पोहोचली नसेल ना? की ती तिथेच आकाशात जाऊन कोणत्या चांदणीत जाऊन बसलीय? की घिरट्या घालतेय फुलपाखरू होऊन निसर्ग रुपी समृद्ध सुंदर झाडावर, पानां-फुलात, की पक्ष्यांत कुठे कुठे. दिसणार तर नाही ही आणि शोधून ही सापडणार नाही. उत्तर नाहीच सापडणार. पण माझा शोध जिथे थांबतोना तिथेच भावनांचा कल्लोळ होतो आणि घेऊन जातो मला. बालपणीच्या आठवणीत त्या एवढ्या तीव्र होतात. डोळ्यांत अश्रू तरळतात आणि मागच्या आठवणीने आई उघड्या डोळ्यांसमोर येते जशीच्या तशीच. आज रात्री 9 वाजता पण तसेच झाले. मला आठवले ते फुलेनगर येथे आमचे राहते घर आणि परिसर. लग्न होई पर्यंत त्या घरात, त्या परिसरात राहिलेली मी. कोजागिरी पौर्णिमा मम्मीची आवडती पौर्णिमा असायची. त्या दिवशी तू आवर्जून चंद्राच्या प्रकाशात तुझी शिलाई मशीन रात्री 8 वाजे नंतर चालवायची. सकाळी बाहेर शेणाने अंगण मोठा चौकोनी ओटा सारवून मोठी भरगच्च रांगोळी काढलेल्या त्या अंगणातील जरा उंच मोठ्या ओट्यावर दिसेल अशा पद्धतीने खिडकीतून लाईट बल्ब वेळुच्या काठीवर लटकावून घेऊन तू त्या प्रकाशात ब्लाऊज, फ्रॉक, पंजाबी ड्रेस असे शिलाईचे काम करायचीस. ते करता करता खूप सुंदर मराठी भावगीतं जुनी हिंदी अशी छान गळ्याने गायचीस आणि आम्ही सर्व जणी काज- बटन, तुरपायी, साडीफॉल वगैरे काम करीत करीत एकीकडे त्यावेळी लाकडाच्या भुश्याच्या शेगडीवर दूध गरम करून त्यात रेडिमेड केशर मसाला टाकून साखर घालून ते गरमा गरम दूध चंद्राला दाखवून ते पीत पीत असे. ते काज बटन लावत हसत खेळत गप्पा मारत बसायचो तुझ्या भोवतीच कुणी सतरंजीवर तर कुणी खुर्च्या, स्टूल टाकून. 12 वाजे पर्यंत कसे बसे जागायचो. त्या नंतर मग एकेकीला पेंग यायची आणि उठून आम्ही झोपायला गेलेलो असायचो. मग तू शेवटी मशीनवर लाकडी झाकण ठेवायची फुलाफुलांचे प्लास्टिक कव्हर टाकायचीस आणि मग झोपायला जायचीस. किती स्पष्ट आठवते आहेस मला तू? मन म्हटलं आज कोजागिरी आई तुला कुठे शोधू ? मशीन चा आवाज नाही ना येत त्या चंद्रातून ना तुझ्या मधुर आवाजातील रसिक बलमा… दिल क्यूँ लागाया तोसे… दिल क्यूँ लागाया…! या लता मंगेशकरच्या गाण्याचा. अशा कशा कशा हिंदी गाण्यांची फर्माईश करायचे. मी तुला गायला लावायचे. वाटायचे मम्मी खुप छान गाते लता मंगेशकर सारखी. पण संधी मिळाली नाही स्टेजवर हिला गाण्याची. नाहीतर मोठी गायिका कलाकार झाली असतीस. तुला चाट्टन तर चायनीज जपानी म्हणायचा तर कधी आमची ही एलिझाबेथ असे म्हणायचा. एवढी गोरी आणि घाऱ्या डोळ्यांची सुंदर आई तू माझी . तुझ्या बरोबर पाहिलेले रात्री चे 9 ते 12 चे जुने सिनेमे आजही आठवतात . त्यातील विशेष करून राज कपूर नर्गिस चे सिनेमे पाहिलेले आवडलेले. दिलीप कुमार छानच पण मला मधुबाला पेक्षाही त्यावेळी नर्गिस जास्त आवडायची. मदर इंडिया दोन वेळेस थेटरलाच दाखवला होता तू. म्हणून की काय ती मदर आवडून मी पण तुला ह्या 5/7 वर्षात मदर इंडिया म्हणायचे. कशी काय आहेस चौकशी करायचे. नंतर कधी कधी आई कुठे काय करतेय ? हे तुझ्या आवडत्या सीरिअल च्या नावा प्रमाणे बोलून तुला विचारायचे. कधी फोन वर तर कधी औरंगाबादला तुझ्याकडे अचानक येऊन भेटून. आता ना तु भेटलीस ना मी चंद्रावर आले तुझा आवाज तुझ्या गाण्याचे मंजुळ सुर ऐकायला. चंद्र पुढे पुढे सरकला आणि तुझ्या आठवणीत अशीच गेली ही कोजागिरी पौर्णिमा. आज 17: तारीख बरोबर 8.50 ला सकाळी हा बघ कावळा आलाय कवकावं करतोय त्याला 2 नेचर ची बिस्किटे ठेवली आहेत. काल फुलपाखराला पाठवले होतेस काय म्हणून आज आलास आणि माझ्या लेखणी ने आता विश्रांती घेतली. -डॉ. उज्ज्वला जाधव, मुंबई. 98924 91491 (लेखिका मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments