प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट-समीक्षक आणि लेखिका नीला वसंत उपाध्ये यांचे सोमवार, दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १०.२० वाजता मुंबईत चेंबूर येथे निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.
चेंबूरच्या चरई विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी पत्रकारितेतील पहिली पूर्णवेळ महिला वार्ताहर असलेल्या नीलाताईंनी १९७० पासून ३६ वर्षे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून वार्तांकन केले होते. गेली अनेक वर्षे त्या विविध दैनिके आणि नियतकालिकांमधून विपुल वैचारिक, ललित तसेच राजकीय स्तंभलेखन करत होत्या. ‘चित्रपश्चिमा’कार म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. शोधपत्रकारिता आणि इतर वार्तांकन, लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाची पहिली महिला कार्यवाह तसेच काही वर्षे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेल्या नीलाताई आजीव सदस्य म्हणून कार्यरत होत्या.
साहित्यसंपदा – ‘सत्यजित : रुपेरी पडद्याचा कवी’, ‘शब्दव्रती शांताबाई’, ‘संशोधक य. दि. फडके’, ‘युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर, ‘भोलू आणि गोलू’; ‘घना जंगल डॉट कॉम’, ‘ती आणि त्या’ (कथासंग्रह), ‘मी वसंततिलका’, ‘हॅरी पॉटरची आई’ अर्थात् जे. के. रोलिंगचे चरित्र, ‘पत्रकार दि. वि. गोखलेः व्यक्तित्व व कर्तृत्व’, कथाव्रती अरविंद गोखले, अनवट निवडक गोखले, राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे,सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रांचे संपादन.
ज्येष्ठ पत्रकार नीला वसंत उपाध्ये यांचे निधन
RELATED ARTICLES
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏