Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रएकी आणि विकासकामांच्या बळावर महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार - महायुतीच्या प्रमुख...

एकी आणि विकासकामांच्या बळावर महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार – महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा विश्वास

प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सामान्य कार्यकर्ता ते बूथ स्तरापर्यंत आवश्यक समन्वय साधण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचे विधानसभा समन्वयक नियुक्त केल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी बुधवारी दिली. महायुतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी महायुती समन्वयक भाजपा आ. प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे महायुती समन्वयक आशिष कुलकर्णी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. महायुतीतील एकी आणि महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळतील असा विश्वासही श्री. देसाई यांनी व्यक्त केला.  

यावेळी श्री. देसाई म्हणाले की, महायुतीमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जण इच्छुक असणे स्वाभाविक आहे.  उमेदवार निवडीचा निर्णय तीन पक्षांतील प्रमुख नेते घेणार आहेत. या निवडणुकीत  विधानसभा समन्वयकांची भूमिका महत्वाची असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील महायुती पदाधिका-यांची एकत्रित बैठक घेऊन बूथ स्तरापर्यंत प्रभावी नियोजन करत समन्वय साधण्याची जबाबदारी या समन्वयकांची असणार आहे.

 लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार, दिशाभूल, फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची मते मिळवली होती . मात्र आता त्यांच्या फेक नरेटिव्ह ला थेट नरेटिव्हने प्रत्युत्तर दिले जाईल. राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र स्तरावर महायुती एकदिलाने काम करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवेल. महायुती सरकारच्या विकासकामांना मतदारासमोर घेऊन जाऊ. सरकारच्या चांगल्या कामांची माहिती मतदारांना देऊन सत्ता मिळवण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळून लावू असेही

श्री. देसाई यांनी नमूद केले.

यावेळी श्री. देसाई आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील यशाबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर,शिर्डी आणि अन्य ठिकाणच्या 7 हजार कोटींहून अधिकच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तेथे उपस्थिती आवश्यक असल्याने, या संयुक्त पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आ. लाड यांनी दिली. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments