मुंबई(रमेश औताडे) : पी एच डी च्या माध्यमातून डॉक्टर पदवी घेणारे संशोधक विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदानातील धूळ , उन , कचरा , अशुद्ध पाणी , डास आदी कारणांमुळे आजारी पडले आहेत.सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना हे आंदोलनकर्ते रुग्णालयात दाखल होत आहेत.
आता आमचा जीव गेला तरी चालेल पण आझाद मैदान सोडणार नाही. आमची दिवाळी आता आम्ही काळी दिवाळी म्हणून आझाद मैदानात साजरी करणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने ” महाज्योती ” उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील गोरगरीब जनतेतील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना फक्त कागदावरच राहिल्याने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले संशोधक विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
” महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती ” गेल्यावर्षी प्रमाणे निकषाच्या आधारे अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात यावी. पीएचडीसाठी नोंदणी झालेल्या दिनांकापासून फेलोशिप अदा करण्यात यावी. सारथीच्या धर्तीवर जिल्ह्यात महाज्योती संस्थेची उपकेंद्रे स्थापन करण्यात यावी. या व इतर नऊ मागण्या सरकारने गांभीर्याने दखल घेत उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
” विद्यार्थी संघ टाटा सामाजिक संस्थेच्या ” माध्यमातून या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.पदवी घेतल्यानंतर आठ वर्ष रक्ताचे पाणी करत डोळ्यात तेल घालून डॉक्टर पदवी पदरात पाडून घेण्याची आमची तयारी सुरू झाली आहे. मात्र खर्च परवडत नसल्याने सरकारने महाज्योती चे लाभ आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना द्यावेत अशी मागणी होत आहे.
लहान बाळ साताऱ्यात आईकडे ठेऊन आंदोलन करण्यास आलेल्या तनुजा पंडित यांनी सरकारच्या या आंधळ्या व मनमानी कारभारावर खंत व्यक्त केली.दिवाळी सण आला आहे व आम्ही इथे आंदोलन करत आहे.माझे लहान बाळ मी आईकडे ठेऊन आली आहे.अजून किती संघर्ष करायचा ? म्हणजे सरकारला आमच्या मागण्या कळतील. संध्याकाळी सहा नंतर आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाही.मग आम्ही राहायचे कुठे ? मुंबईत नातेवाईक किती दिवस सहकार्य करणार ? असा सवाल तनुजा पंडित यांनी केला.
आमचे हे आंदोलन प्रसिध्दी माध्यमांच्या सहकार्याने सरकारला कळावे म्हणून आर्थिक परिस्थिती नसतानाही हॉल बुक करत पत्रकार परिषद घेतली.मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेचा अनुभव वाईट आला. माध्यमाने पाठ वळवली व आमचे आर्थिक नुकसान झाले. गावाकडे आई वडील आमच्या काळजीत असताना आंदोलन काळात येणारे मुंबईचे अनुभव फार वाईट आहेत.असे सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील वैभव जानकर या भावी डॉक्टर ने सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
आझाद मैदानातील आंदोलनकर्ते रुग्णालयात.
दिवाळीचा आनंद सर्वत्र सुरू असताना , आझाद मैदानात आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागण्यांवर कायम आहेत.
तैय्यबा मुलाणी , वैभव जानकर ,अविनाश गुरव , तैय्यबा मुलाणी , रोहित परीट , बापूराव घुंगरगावकर , जेतालाल राठोड , तनुजा पंडित
सद्दाम मुजावर हे भावी डॉक्टर आजारी पडले आहेत .
खोकला, ताप, सर्दी, श्र्वसनाचा त्रास,दम लागणे, चक्कर येणे,अशक्तपणा इत्यादी आजारांमुळे संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर त्रस्त झाले आहेत. आता आमचा जीव गेला तरी मैदान सोडणार नाही.असा इशारा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.
लक्ष्मपूजनाच्या दिवशी मी माझे लहान बाळ आईकडे ठेऊन इथे आली आहे.सरकार मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात गुंग आहे.असे संतप्त होत तनुजा पंडित यांनी सांगितले.